काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपाची चर्चा  सुरू झाली असली तरी राज्यात ताकद कोणाची अधिक, हा चर्चेतील वादाचा मुद्दा ठरला आहे. राष्ट्रवादीने निम्म्या जागांची मागणी करताना काही जागा बदलून देण्याची मागणी केली असली तरी काँग्रेसला ते मान्य नाही. दुसरीकडे, मित्रपक्षांना सामावून घेताना दोन्ही पक्षांनी जागा सोडाव्यात, या प्रस्तावामुळे आपल्याच जागा कमी होतील अशी काँग्रेसला भीती आहे. लोकसभेच्या पुणे, औरंगाबाद या मतदारसंघांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत लोकसभेसाठी मतदारसंघनिहाय चर्चा सुरू करण्यात आली.  लोकसभेच्या ४८ पैकी निम्म्या म्हणजे २४ जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने सादर केला.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार, तर काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले होते. यामुळे अधिक जागांवर आमचा दावा असल्याचा युक्तिवाद राष्ट्रवादीकडून करण्यात आला. त्यावर विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढूनही काँग्रेसचे ४२, तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. परिणामी काँग्रेसची ताकद जास्त असल्याचे स्पष्ट होते, असे काँग्रेसचे म्हणणे होते. भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला, तर पालघरमध्ये काँग्रेसचा  पराभव झाला याकडे राष्ट्रवादीने लक्ष वेधले.

भाजपच्या  आघाडी करण्याची योजना आहे. बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आदींशी चर्चा करण्यात येणार आहे. आपापल्या मित्रपक्षांसाठी जागा सोडाव्यात, असा पर्याय मांडण्यात आला. मायावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर येऊ शकतात, असा काँग्रेस नेत्यांना आशावाद आहे. तसे झाल्यास विदर्भात दोन तरी जागा सोडाव्या लागतील. समाजवादी पक्षाने एका जागेवर दावा केला आहे. हे सारे पक्ष बरोबर आल्यास काँग्रेसच्या वाटय़ाच्या जागा कमी होऊ शकतात, अशी काँग्रेस नेत्यांना भीती आहे.

राहुल गांधी-शरद पवार यांची भेट

आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यात काँग्रेसबरोबर चर्चेच्या वाटाघाटीत कोणत्या जागांवर दावा करायचा याचा खल करण्यात आला. पुणे, औरंगाबाद, जालना, यवतमाळ या मतदारसंघांपैकी काही बदलून मिळावेत, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांना आपल्या मुलासाठी नगर मतदारसंघ हवा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि  शरद पवार यांच्यात गुरुवारी नवी दिल्लीत भेट झाली. यानंतरच राष्ट्रवादीने जागावाटपात आक्रमक भूमिका घेतली.