काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीवारी  ; सेनेच्या समर्थनाची काही नेत्यांची उघड भाषा

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता काँग्रेसमधूनही दबाव वाढू लागला आहे. विशेषत तरुण आमदारांचा गट त्यासाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही जोरदार हालचाली सुरूआहेत.

शिवसेना नेत्यांच्या उघड गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे उघड समर्थन करण्याची काही नेत्यांकडून भाषा केली जात आहे. काँग्रेस नेत्यांचे लक्ष वेधण्याकरिता काही तरुण आमदार नवी दिल्लीत जाणार आहेत.

प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याबाबत काय निर्णय घ्यायचा तो पक्षश्रेष्ठींनी घ्यावा, अशी भूमिका घेतली. परंतु पक्षातून तरुण आमदारांचा गट आता पुढे आला आहे, त्यांनी राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला समर्थन द्यावे, असा पवित्रा घेतला आहे. प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर, आमदार विश्वजित कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, तशा भावना व्यक्त केल्या. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतली, तो आम्ही मान्य करू, असे सांगितले.

काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राज्यातील राजकीय परिस्थितीवर आपण राऊत यांच्याशी चर्चा केल्याचे दलवाई यांनी सांगितले. त्यानंतर सांयकाळी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला समर्थन द्यायचे का यावर खलबते झाल्याचे समजते.

तर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यात बिगर भाजप सरकार स्थापन व्हावे, ही काँग्रेसजनांची भावना आहे, असे वक्तव्य केले आहे. शिवसेना काय भूमिका घेते, त्यावर पुढचे राजकारण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेत्यांची बैठक

काँग्रेस नेत्यांची सायंकाळी बैठक पार पडली. त्यात बिगर भाजप सरकारसाठी पुढाकार घ्यावा, असा तरुण आमदारांचा सूर होता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना-राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी या आमदारांनी दर्शविली. पाच वर्षे विरोधात बसलो. आणखी पाच वर्षे विरोधात बसल्यास भाजपकडून पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला जाईल. तेव्हा आलेली संधी दवडू नये, असाच आमदारांचा सूर होता. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नकारात्मक भूमिका घेतली असली तरी आमदार मात्र शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारसाठी आग्रही आहेत.