भारतीय जनता पार्टीवर आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्याऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची माफी मागावी अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच असा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत याचे पुरावेही सादर करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. आमच्यावर होत असलेला आमदार खरेदी-विक्रीचा आरोप खोटा आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या ४८ तासांत पुरावे द्यावेत. आम्ही कोणालाही फोन केलेला नाही. मात्र तुमचा आरोप असेल तर आपल्या फोनमधील या संभाषणाचे रेकॉर्ड काढावे आणि सादर करावे, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.

आणखी वाचा- शिवसेना आमदाराला भाजपाकडून ५० कोटींची ऑफर : विजय वडेट्टीवार

मुनगंटीवार म्हणाले, जे शिवसेनेचे आमदार १५ वर्षे सत्ता नसतानाही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ठाम राहिले, ते आत्ता कसे फुटतील? शिवसेनेने आपले आमदार फुटतील या भीतीने नव्हे तर दुसऱ्याच कुठल्यातरी कारणासाठी त्यांना हॉटेलवर नेऊन ठेवले आहे. भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. भाजापा विचाराच्या लाढाईवर काम करीत आली असून यापुढेही राहिल. आमदार खरेदी-विक्रीचा मुद्दा काढून काँग्रेस-राष्ट्रवादीने जनादेशाचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि आपल्या आमदारांवर अविश्वास दाखवल्याबद्दल त्यांचीही माफी मागावी.

सत्ता-स्थापनेबाबतची कोंडी फुटेल असा मला विश्वास आहे. जनतेने महायुतीला जो जनादेश दिला आहे त्याचा आम्ही आदर करतो. शिवसेनेने असं कधीही म्हटलं नाही की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चाललो आहोत. त्यामुळे कधीतरी चर्चेतून तोडगा निघेल आणि गोड बातमी येईलच, त्यासाठी वेट अॅण्ड वॉच, असेही यावेळी मुनगंटीवार म्हणाले.