News Flash

“संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये?” UPA अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर काँग्रेसची आगपाखड!

संजय राऊतांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानावरून काँग्रेसने ती शब्दांत टीका केली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. (संग्रहित छायाचित्र)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “शरद पवार यांनी युपीएचं अध्यक्षपद भूषवायला हवं”, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. मात्र, यावरून आता काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असा गोंधळ निर्माण झालेला आहे. बऱ्याचदा ते अशी आवई उठवतात आणि नंतर गोत्यात येत असतात. आत्ता त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. राज्यातल्या सरकारमुळे काँग्रेस नसून काँग्रेसमुळे हे सरकार बनलेलं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचा वाद निर्माण करताना त्याचं भान त्यांनी ठेवणं आवश्यक आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

“NCP ला जरा काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या म्हणून…”

हुसेन दलवाई यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये समाचार घेतला. ” संजय राऊतांचं हे विधान हास्यास्पद आहे. अशी विधानं करण्याची त्यांना सवय झाली आहे. काहीही बोलतात आणि बऱ्याच वेळा गोत्यात येतात. शिवसेना अजूनही युपीएमध्ये नाही. असं असताना युपीएचं प्रमुख कोण होणार, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कुणी? ही अशी बावचट चर्चा करण्याची काय गरज आहे? स्वत: शरद पवारही असं म्हणणार नाही. काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष आहे. असं असताना त्याचं नेतृत्व इतर पक्षाचं कुणी कसं करणार? एनसीपी ही काही ऑल इंडिया पार्टी नाही. एनसीपी राज्यातल्या विशिष्ट गटापुरता आणि विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित पक्ष आहे. सध्या काँग्रेसपेक्षा जरा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणून युपीएचं अध्यक्षपद त्यांना मिळेल असं समजणं चुकीचं आहे”, अशी खरमरीत प्रतिक्रिया हुसेन दलवाईंनी दिली आहे.

शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधी संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…

“राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही”

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील संजय राऊतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. “शिवसेना युपीएचा घटक नाही. त्यांनी आधी युपीएचा घटक व्हावं आणि मग त्यांना बोलण्याचा अधिकार असेल. त्यांना सातत्याने काही ना काही लिहावं लागतं. त्यामुळे ते सातत्याने अशा मागण्या करत असतात. एकदा सांगूनही ते पुन्हा पुन्हा त्यांना सांगावं लागतं. राज्यातली आघाडी एका विशिष्ट परिस्थितीत आहे. वैचारिक भिन्नता असूनही भाजपाचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. युपीए हे राष्ट्रीय दल आहे. त्यामुळे याबाबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही”, असं सावंत म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:00 pm

Web Title: congress slams sanjay raut statement on sharad pawar as upa head pmw 88
टॅग : Maharashtra Politics
Next Stories
1 “फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून राज्यपालांना फोन करून विचारतात…,” कुणाल कामराचं खोचक ट्विट
2 सचिन वाझेंसोबत असणारी ‘ती’ महिला कोण?; NIA कडून शोध सुरु
3 टाळेबंदी नाही, कठोर निर्बंध
Just Now!
X