News Flash

सावरकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा पाठिंबा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे वक्तव्य

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे वक्तव्य, मुख्यमंत्र्यांच्या बाबरीवरील वक्तव्यावर मात्र मौन

मधु कांबळे

सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याचा विधिमंडळात ठराव मांडल्यास, जनभावना त्या बाजूने असेल तर काँग्रेसचा पाठिंबा राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याबाबतची काँग्रेसचीही तशीच भूमिका राहील, असे त्यांनी म्हटले आहे. बाबरी मशीद पाडल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मात्र पटोले यांनी मौन पाळले.

विधानसभेत बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजपची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न के ला; परंतु सर्वधर्मसमभावाची भूमिका घेणाऱ्या व किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सरकारमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली. मुख्यमंत्री म्हणून सभागृहात शिवसेनेने बाबरी मशीद पाडल्याचा अभिमान व्यक्त करणारे वक्तव्य करणे, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याच्या महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाला, तसेच काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष भूमिकाला धरून आहे का, याकडे पटोले यांचे लक्ष वेधले असता, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली, असे सांगत, त्यांनी त्यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. काँग्रेसची मात्र सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असल्याची सारवासारव त्यांनी केली. काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करीत, सभागृहात बाबरी मशिदीबद्दलचे विधान टाळायला हवे होते, असे खासगीत मत व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भाजपवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी सावरकरांच्या भारतरत्न किताबाचा व औरंगाबाद शहराच्या नामांतराचाही विषय उपस्थित केला. सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी करणारी दोन वेळा पत्रे केंद्र सरकारला पाठविली. भारतरत्न देण्याचा अधिकार पंतप्रधान कार्यालयाचा आहे, ते देत नाहीत, असे सांगून ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर आम्ही करूच, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

सावरकरांना भारतरत्न देणे आणि औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करणे, या दोन्ही प्रश्नांवर काँग्रेस काय भूमिका घेणार, असे पटोले यांना विचारले असता, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फु ले यांना भारतरत्न किताब मिळाला पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे सांगत त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. मात्र सत्ताधारी महाविकास आघाडीच्या वतीने सावरकरांना भारतरत्न मिळण्यासाठी शिवसेनेने सभागृहात ठराव मांडला तर, त्या वेळी काँगेस काय भूमिका घेणार, या थेट प्रश्नावर सावरकरांना भारतरत्न द्यावा, तसेच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करावे, अशी जनभावना असेल, तर त्या बाजूने काँग्रेसची भूमिका असेल असे त्यांनी सांगितले. अर्थात आज महागाई, इंधन दरवाढ हे सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याला सरकारचे प्राधान्य राहणार आहे. एखाद्या शहराचे नाव बदलले म्हणून लोकांचे जगण्याचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

थेट उत्तर टाळले

सावरकरांना भारतरत्न देणे आणि औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करणे, या दोन्ही प्रश्नांवर काँग्रेस काय भूमिका घेणार, असे पटोले यांना विचारले असता, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न किताब मिळाला पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे सांगत त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:19 am

Web Title: congress supports giving bharat ratna to savarkar abn 97
Next Stories
1 सरकार कुणा एकटय़ाची जहागिरी नसल्याची काँग्रेस आमदाराची टीका
2 कायद्यात दुरुस्तीबाबत महाधिवक्त्यांशी सल्लामसलत
3 ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ वार्षिकांकाच्या प्रकाशनानिमित्त गुंतवणूकदारांशी संवाद
Just Now!
X