26 February 2021

News Flash

एसटीत कंत्राटयुग?

एसटीतील मान्यताप्राप्त संघटनांनी त्यात खुसपट काढून वेळोवेळी प्रस्ताव मोडला.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

सुधारित वेतनवाढ मान्य करा, नाहीतर कंत्राटावर या : सरकारचा ‘प्रस्ताव’

मुंबई : केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाचे सूत्र वापरून तयार केलेली नवी वेतनवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी ७ जूनपर्यंत स्वीकारावी. ती मान्य नसल्यास राजीनामे देऊन पाच वर्षांच्या कंत्राटी सेवेत दाखल व्हावे, असा प्रस्ताव परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी एसटी संघटनांसमोर ठेवला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढीवरून एसटीत संघर्ष सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी हा प्रस्ताव जाहीर केला. ते म्हणाले की, वेतन करार हा चार वर्षांसाठी केला जातो आणि गेल्या दोन वर्षांपासून तो झालेला नाही. त्यामुळे २०१६ ते २०२० या चार वर्षांसाठी चार हजार ८४९ कोटी रुपयांचा वेतन करार घोषित करीत आहे.

कर्मचारी-कामगारांना सुधारित वेतनवाढ संमतीपत्रावर गुरुवार ७ जूनपर्यंत सही करणे आवश्यक आहे. ज्यांना ती मान्य नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांना पाच वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर नोकरी दिली जाईल, असे रावते यांनी स्पष्ट केले. राजीनामा दिल्यास महिन्याला चालकाला २० हजार रुपये आणि वाहकाकरिता १९ हजार रुपये वेतन दिले जाईल. तसेच प्रत्येक वर्षी २०० रुपये वाढही देण्यात येईल. त्यामुळे हा निर्णय सर्वतोपरी कर्मचारी आणि कामगारांवरच अवलंबून असल्याचे ते म्हणाले. नव्याने सेवेत येणाऱ्या नियमित चालकाला ११ हजार ६०० रुपयांपर्यंत तर वाहकाला ११ हजार ३०० रुपयांपर्यंत वेतन मिळते.

कामगारांचा वेतन करार अनेक कारणास्तव रखडला. एसटीतील मान्यताप्राप्त संघटनांनी त्यात खुसपट काढून वेळोवेळी प्रस्ताव मोडला. त्यानंतर मात्र सर्व कायदेशीर बाजू तपासून कामगार संघटनेला जरी वेतन करार मान्य नसेल तरीही कामगारांचे हित पाहून एसटी वेतनवाढ करू शकते, असे दिसून आल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.

एसटीच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सह्य़ाद्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध योजनाही जाहीर केल्या.

कनिष्ठ वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी

वेतनसुधारणेमुळे पाच वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या चालकाचे ३१ मार्च २०१६ रोजीचे असुधारित मासिक वेतन १८,७२४ रुपये आहे. ते १ एप्रिल २०१६ पासून २५ हजार २०० रुपये आणि १ एप्रिल २०१८ रोजी २७ हजार ८२९ रुपये होणार आहे. वेतनात प्रत्येक महिन्याला ४,२७५ रुपये आणि ९,१०५ रुपये अशी वाढ असणार आहे. तीन वर्षे चालकवर्गामध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्याच्या वेतनातही वाढ होणार आहे. १२ हजार ५८७ रुपये असलेले वेतन १ एप्रिल २०१६ रोजी १५ हजार ९६८ रुपये यानुसार पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल. तर १ एप्रिल २०१८ रोजी ते वेतन १७ हजार ६३५ रुपये होईल.

नियमित वेतनश्रेणीतील कर्मचारी

नियमित वेतनश्रेणीतील चालकाला ३१ मार्च २०१६ रोजी २,२५५ ते ७,३७४ एवढी वेतनवाढ पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल. तर ३१ मार्च २०१८ रोजी ३ हजार ६९२ रुपये ते १२ हजार ७१ रुपये इतकी वाढ आहे.

नवीन प्रस्तावात नेमके काय?

’ कामगार संघटनेच्या करारामुळे १९९६ पासून भत्त्यातही फारशी वाढ नाही. त्यामुळे चालकाला मिळणारा १८० रुपये हजेरी प्रोत्साहन भत्ता १,२०० रुपये होईल.

’ धुलाई भत्त्यातील सुती, वुलन गणवेश आणि वुलन जर्सीचे सुधारित दर प्रत्येकी १०० रुपयांपर्यंत जातील. जे सध्या अनुक्रमे ५०, १८ आणि १४ रुपये आहेत.

’ रात्री ७ ते सकाळी ६ पर्यंतसाठी सध्या ११ रुपये रात्रपाळी भत्ता आहे. तो किमान तीन तासांसाठी ३५ रुपये तर किमान पाच तासांसाठी ४५ रुपये होईल.

’ रात्रवस्ती भत्त्यातही वाढ करण्यात येत असून सध्याच्या साधारण ठिकाणी असलेला ४ रुपये भत्ता ७५ रुपये, जिल्हा ठिकाणी ११ रुपये असलेला हा भत्ता ८० रुपये होणार आहे.

परिवहनमंत्र्यांनी केलेल्या एकतर्फी वेतनवाढीबाबत अधिकृत पत्र मिळालेले नाही. वेतनवाढीच्या प्रस्तावात आकडेवारीत गोलमाल केलेली दिसून येते. वाटाघाटीच्या बैठकीत मान्य केल्याप्रमाणे लाभ दिलेला नाही. तसेच कंत्राटी पद्धतीची धमकीही आहे. वेतनवाढीअभावी त्रस्त असलेल्या कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. संमतीपत्रे जबरदस्तीने भरून घेण्याचा प्रयत्न झाल्यास उद्रेक होईल.  

– संदीप शिंदे, अध्यक्ष, मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 3:43 am

Web Title: contract system in msrtc msrtc employee salary transport minister diwakar rao
Next Stories
1 भंडारा-गोंदियातील विजय माझ्यामुळेच – नाना पटोले
2 मेंढीपालनासाठी मेंढय़ांच्या नवीन जातींचा विकास
3 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये
Just Now!
X