News Flash

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलमधून ठेकेदाराची तिप्पट कमाई

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलमधून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या साडेचार वर्षांत तब्बल ११७६ कोटी रुपयांची कमाई केली

चार वर्षांत ११७६ कोटींचे उत्पन्न; त्रयस्थ यंत्रणेमार्फत प्रमुख टोल नाक्यांवरील वाहने मोजण्याची मागणी
मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलमधून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या साडे चार वर्षांत तब्बल ११७६ कोटी रुपयांची कमाई केली असून, टोल आणि वाहनांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेता, १६ वर्षांच्या या टोवसुलीच्या ठेक्यात कंपनीस किमान तिप्पट फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्य सरकारने राज्यातील काही टोलनाके बंद करून लोकांची टोलमधून सुटका केली असून, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलमधूनही लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे.
या समितीचा अहवाल आल्यानंतर छोटय़ा वाहनांना टोलमधून सवलत देण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू असतानाच टोलच्या माध्यमातून ठेकेदारांच्या होत असलेल्या कमाईचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील पथकराच्या कंत्राटाबाबतचे सर्व दस्तावेज खुले केल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने आता मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाचही टोलनाक्यांच्या टोलवसुलीच्या ठेक्याबाबतच्या कराराचेही दस्तावेज आपल्या संकेतस्थळावर खुले केले आहेत. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस येऊ लागल्या आहेत.
विशेष म्हणजे कंपनीने एमएसआरडीसी सोबत केलेल्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात वाढ होणार असून, वाहनांच्या संख्येतही दरवर्षी साधारणत: १० टक्क्यांपर्यंत वाढ होते. त्यामुळे कंपनीला मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करता त्यांना तिप्पट कमाई होणार असल्याचे स्पष्ट होते.
विशेष म्हणजे कंपनीने स्वत: दिलेल्या आकडेवारीवरून हा अंदाज असला, तरी शासनाकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने ठेकेदाराने दिलेली आकडेवारी तरी किती खरी आहे. शिवाय वाहनांची संख्या तरी खरी दाखविली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे शासनाने त्रयस्थ यंत्रणेमार्फत राज्यातील सर्वच प्रमुख टोल नाक्यांवरील वाहनांची गणना करावी. त्यामुळे ठेकेदारांची खरी कमाई समोर येईल, अशी मागणीही त्यांनी केली.

२१०० कोटी रुपयांच्या बदल्यात मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यांवर डिसेंबर २०१० ते जानेवारी २०२६ पर्यंत म्हणजेच १६ वर्षे टोलवसुलीचा ठेका एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस देण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र या कंपनीने मार्च २०१५ अखेर ११७६ कोटी रुपये गोळा केल्याचे कागदपत्रावरून स्पष्ट होत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 3:49 am

Web Title: contractor grab the money from toll
टॅग : Contractor
Next Stories
1 वनजमिनींवरील इमारतींना पुन्हा हादरा..
2 भ्रष्टाचारी, हेकेखोर हे शब्द चिकटल्याने कारकीर्द पूर्ण!
3 अग्निशमन दलाकडून ४७६ नागरिकांना प्रशिक्षण
Just Now!
X