निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : मोठय़ा प्रमाणात झालेल्या स्वेच्छानिवृत्तीमुळे रिकाम्या झालेल्या ‘महानगर टेलिफोन निगम’च्या मुंबई व दिल्लीतील कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी व्यवस्थापनाने ५५ कोटींचे कंत्राट निविदा न मागविता जारी केल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करून कुठल्याही प्रकारचा आरोप न होण्याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना एकीकडे डिसेंबर व जानेवारी महिन्याचे वेतन उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या व्यवस्थापनाने कंत्राटी भरतीसाठी तातडीने आर्थिक तरतूद करून कंत्राटही जारी केले आहे. व्यवस्थापनाने ३ फेब्रुवारी रोजी आदेश जारी करून नवी दिल्लीतील ‘अ‍ॅकमे एक्सलन्ट मॅनेजमेंट प्रा. लि.’ या कंपनीला सहा महिन्यांसाठी वाहनचालक, लाइनमन, साहाय्यक लाइनमन आणि सफाई कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटापोटी सहा महिन्यांसाठी ५५ कोटी खर्च होणार आहेत.

यात लाइनमनसाठी ४०,२४१ रुपये व साहाय्यक लाइनमनसाठी ३७,२०५ रुपये, तर सफाई कर्मचारी/सुरक्षारक्षक यासाठी ३६,५८३ रुपये वेतनाची तरतूद करण्यात आली आहे.

यासाठी निविदा जारी करणे आवश्यक होते, याकडे ‘युनायटेड फ्रंट’ या कर्मचारी संघटनांच्या महासंघाने लक्ष वेधले.

‘एमटीएनएल’मधील माजी कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना फक्त १६ ते १९ हजार रुपये मानधन देण्याची तयारी दाखविणे म्हणजे मोठय़ा प्रमाणात मलिदा खिशात टाकण्याचा प्रकार असल्याचा आरोपही केला जात आहे. या कंपनीचे कार्यालय ठाण्यात असून या कंपनीने भरतीसाठी विभागनिहाय (झोन) प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे सर्व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केवळ सहा महिन्यांकरीता हे मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट असून, ते सरकारी संकेतस्थळावरूनच मागविण्यात आले. त्यात कुठल्याही प्रकारचा घोळ नाही.     

– सुनील कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय  संचालक, एमटीएनएल

आरोप काय? : दहा हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची खरेदी करण्यासाठीही निविदा मागविणाऱ्या व्यवस्थापनाने ५५ कोटी खर्च करताना निविदा न मागविल्याने कर्मचारी संघटनेकडून कोणताही आक्षेप घेतला जाऊ नये, यासाठीच या पदाधिकाऱ्यांनाच प्रभारी नेमण्यात आल्याचा आरोपही महासंघाने केला आहे. या कंपनीने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ४८७ जणांची यादी कंत्राटी कर्मचारी म्हणून सादर केली आहे. याबाबत कंपनीने ‘एमटीएनएल’ला पाठविलेल्या मेलमध्ये ही माहिती दिली आहे.