वैद्यक परिषदेच्या निकषांचे पालन करण्यात कसूर

मुंबई : महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करून उद्घाटन केलेल्या विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयाशी संलग्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता धोक्यात येण्याची शक्यता आहे. महाविद्यालय सुरू होऊन तीन वर्षे उलटली असून भारतीय वैद्यक परिषदेच्या (एमसीआय) निकषांनुसार आवश्यक असलेल्या प्राध्यापकांच्या किमान जागा भरण्यातही महापालिकेला यश आलेले नाही. प्राध्यापकांच्या १२० पैकी ३१ जागा रिक्त असून महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्याची प्रक्रियाही वर्षभराहून अधिक काळ फक्त निविदेमध्येच अडकली आहे.

उपनगरात वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयाचे स्वप्न दाखवून २००९ मध्ये विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयाच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली. यासाठी तब्बल ३२१ कोटी रुपये खर्च करण्यात आला. ६४० खाटांच्या या रुग्णालयाशी संलग्न महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी मिळाल्यावर २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांसाठी १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मुंबईत केईएमपाठोपाठ विद्यार्थ्यांची या महाविद्यालयाला पसंती मिळाली. सध्या या महाविद्यालयात ४५० विद्यार्थी असून चौथ्या वर्षांची प्रवेशप्रक्रिया जुलैमध्ये सुरू होईल. मात्र त्यासाठी भारतीय वैद्यक परिषदेकडून (एमसीआय) मान्यता मिळण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

गेली तीन वर्षे परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून या महाविद्यालयातील प्राध्यापक संख्येबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. साधारण दहा टक्के जागा रिक्त असल्यास एमसीआय मान्यता देते. मात्र आता किमान आवश्यक असलेल्या १२० प्राध्यापकांपैकी तब्बल ३१ जागा म्हणजे २५ टक्क्यांहून अधिक जागा कमी आहेत. या जागा भरण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी महापालिका देत असलेली वेतनश्रेणी व उमेदवारांच्या अपेक्षा यात मोठा फरक असल्याने या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. आता पुन्हा एकदा व्याख्याते भरण्यासाठी पालिकेकडून जाहिराती काढण्यात आल्या आहेत. मात्र त्यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. प्राध्यापकांऐवजी एमबीबीएस झालेल्या मार्गदर्शकांची (टय़ूटर) कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाते. मात्र त्यामुळे अध्यापनाचा दर्जा टिकवता येत नाही, असा आरोप रुग्णालयाशी संबंधित डॉक्टरांनी केला.

जोगेश्वरी ट्रॉमा केअरचेही आयसीयू खासगी हातात 

केईएम, नायर, शीव या रुग्णालयातील वैद्यकीय सेवा ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बळावर चालवली जाते. मात्र महाविद्यालयाशी संलग्नित असूनही जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमधील अतिदक्षता विभागातील २० खाटांचे खासगीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. खासगी संस्थेचे डॉक्टर अतिदक्षता विभागातील रुग्णांची २४ तास देखभाल करणार आहेत. कूपरवरही ही वेळ येण्याची भीती होती. मात्र सध्या ती तात्पुरती टळली आहे.

कर्मचारीही कमी

केवळ प्राध्यापक, सहप्राध्यापक आणि साहाय्यक प्राध्यापकांच्याच नाही तर प्रयोगशाळा साहाय्यक, लेखनिकांपासून शिपाई, कंत्राटी सफाई कामगारांच्याही जागा रिक्त आहेत. मुळात मान्यता मिळालेल्या पदांची संख्याच कमी असून त्यातही जागा रिक्त असल्याने इतर प्राध्यापक, कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो. प्राध्यापकांसोबतच कर्मचारी भरण्यासाठी दर आठवडय़ाला बैठक घेतली जाते. मात्र त्यातून महाविद्यालय व रुग्णालयाच्या हाती काही पडत नाही.

प्राध्यापकांच्या जागा कमीच

शीव रुग्णालयात १७५० खाटा असून १०० विद्यार्थी क्षमता आहे. तिथे प्राध्यापकांच्या ३१३ जागा आहेत. केईएम रुग्णालयातील १८०० खाटा आणि १८० विद्यार्थ्यांसाठी ४९८ प्राध्यापकांच्या जागा असून नायरमधील १३०० जागांसाठी व १२० विद्यार्थ्यांसाठी ३२२ जागा आहेत. त्या तुलनेत ६४० खाटा व १५० विद्यार्थ्यांसाठी कूपर रुग्णालयात प्राध्यापकांच्या १२० जागांनाच मान्यता देण्यात आली आहे. त्यातही ३१ जागा रिक्त आहेत.

 

‘प्रयत्न सुरू’

वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्राध्यापकांच्या जागा भरणे हे अवघड काम असते. प्राध्यापकांच्या जागांबाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना असून त्यांच्याकडून डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. भारतीय वैद्यक परिषदेचे निकष पूर्ण करण्यासाठी पालिकेची यंत्रणा महाविद्यालयाच्या पाठीशी उभी आहे, असे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले.

महाविद्यालयाची पाश्र्वभूमी

* विलेपार्ले येथील ६४० खाटा असलेल्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयाशी संलग्नित  असलेल्या या महाविद्यालयाला २०१५ मध्ये परवानगी मिळाली.

*  दरवर्षी या महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. महापालिकेच्या इतर तीन प्रमुख रुग्णालयांपैकी केईएममध्ये १८०, नायरमध्ये १२० तर शीवमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

*  पहिल्या वर्षी, २०१५ मध्ये इतर तीन रुग्णालयांमधील प्राध्यापकांची जुळवाजुळव करून ५४ जागा भरण्यात आल्या.

*  १५० विद्यार्थ्यांसाठी किमान ७५० खाटांच्या रुग्णालयाचा निकष असल्याने कूपरसोबतच जोगेश्वरीचे बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरही या महाविद्यालयाला जोडले गेले.