तात्पुरत्या जामिनामुळे कारागृहातून सुटका झालेल्या आरोपींकडून गैरकृत्य होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण

मुंबई : कठोर र्निबधाच्या काळात शहरातील गुन्हे वाढले असून हत्येचा प्रयत्न, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्य़ांपासून वाहनचोरी, घरफोडी, दरोडय़ाच्या गुन्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे मुंबईतील पोलीस ठाण्यांमधील नोंदींवरून स्पष्ट होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमी वर कारागृहांतील गर्दी कमी करण्यासाठी आरोपींना तात्पुरत्या जामिनाची मुभा देणे, हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

करोना संसर्गाची पहिली लाट थोपविण्यासाठी टाळेबंदी लादण्यात आली. या काळात विनाकारण घराबाहेर पडणे अशक्य होते. नागरिक आपापल्या घरातच होते. रेल्वे स्थानके , ठरावीक दुकाने सोडल्यास बाजारपेठा ओस पडल्या होत्या. त्यामुळे गुन्ह्य़ांचा आलेख उतरला. मात्र पहिली लाट ओसरल्यावर हा आलेख पुन्हा चढू लागला. दुसरी लाट थोपविण्यासाठी कठोर निर्बंध जारी करण्यात आल्यावरही हा आलेख चढाच राहिला.

मुंबई पोलिसांच्या संके तस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार, दंगल, विनयभंग, सोनसाखळी चोरी सोडल्यास हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, खंडणी, वाहन चोरी, हाणामारी आदी गुन्ह्य़ांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून टाळेबंदी सुरू झाली. यावर्षी एप्रिल महिन्यापासून कठोर निर्बंध लागू झाले. दोन्ही वर्षांमध्ये जानेवारी ते मार्च हा काळ साधारण सारखाच होता.

करोना संसर्ग कारागृहात पसरू नये या उद्देशाने गृहविभागाने उच्चाधिकार समिती नेमून विविध गुन्ह्य़ांत अटक झालेले आरोपी आणि दोष सिद्ध झाल्यावर शिक्षा भोगणाऱ्या कै द्यांना तात्पुरता जामीन आणि पॅरोलची मुभा उपलब्ध करून दिली. न्यायालयांनी परिस्थिती, पुरावे, आरोपीची पार्श्वभूमी  पाहून जामीन अर्जावर निर्णय घेतला. मात्र तरीही गेल्या सव्वावर्षांत राज्यभरातील कारागृहांमधून सुमारे १२ हजार कै दी, आरोपी तात्पुरता जामीन, पॅरोल मिळवून बाहेर पडले. यात मुंबई महानगर प्रदेशातील आर्थर रोड, ठाणे, कल्याण आणि तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्यांची संख्या जास्त आहे. सराईत आरोपी सहजरीत्या जामिनावर सुटल्यानेच गुन्हे वाढल्याचे निरीक्षण मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवले आहे.

स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आरोपींना अटक करतात. मात्र आरोपी करोनाचे निमित्त पुढे करून जामीन मिळवतात. बाहरे येऊन पुन्हा गुन्हे करतात. विशेषत: चोर, पाकीटमार, मोबाइल चोर, वाहन चोर, सोनसाखळी चोर, घरफोडय़ा करणाऱ्यांचा उदरनिर्वाह गुन्ह्य़ांवर अवलंबून असतो. तसेच कितीही वेळा अटक झाली तरीही ते कारागृहातून सुटल्यावर पुन्हा गुन्ह्य़ांची मालिका सुरू ठेवतात, हा पोलिसांना येणारा नित्याचा अनुभव आहे.