राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात मुंबई देखील मागे नाही. मात्र, असं असताना आता मुंबईत लसींचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. खुद्द मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. “मुंबईत सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे मिळून १ लाख ८५ हजार डोस शिल्लक आहेत. तसेच मुंबईला मिळणारा पुढचा लसींचा साठा हा १५ एप्रिलनंतर मिळणार आहे. त्यामुळे येत्या ३ दिवसांत मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो”, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच, यावेळी किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याची देखील टीका केली आहे.

लसींचा तुटवडा का?

मुंबईतल्या लसीकरण कार्यक्रमाविषयी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मुंबईत कोविशिल्ड लसींचे एकूण १ लाख ७६ हजार ५४० डोस शिल्लक आहेत. त्यासोबतच कोवॅक्सिन लसींचे ८ हजार ८४० डोस शिल्लक आहेत. मुंबईत आपण दररोज ५० हजार व्यक्तींना लसीचे डोस देत आहोत. मुंबईतच्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये दिवसाला दीड ते दोन हजार लसींचे डोस दिले जात आहेत. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होणार आहे”.

“महाराष्ट्राला सापत्न वागणूक”

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मुंबईत लसींच्या डोसचा तुटवडा निर्माण होणार आहे. पुढचा लसींचा साठा १५ तारखेनंतर येणार आहे. मग तोपर्यंत आम्ही काय करायचं? सह्याद्रीला नेहमीच केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. वरवर माया आणि पोटभर जेव ग बया असं केंद्र सरकारचं सुरू आहे. आम्ही जर लसीकरण करायचंय तर आम्हाला मिळायला तर पाहिजे ना.. आम्ही सगळे नियम पाळतो आहोत. राज्य सरकार पत्र पाठवतंय. तरी आम्हाला लस मिळत नाहीये”, असं महापौर म्हणाल्या.

दरम्यान, यावर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली गेली आहे. “केंद्र नक्कीच पुरवठा करेल. आम्ही त्याचा आग्रह करू. आत्तापर्यंत केंद्राच्या मदतीच्या जिवावरच महाराष्ट्र करोनातून सावरलाय. मुंबई किंवा महाराष्ट्र आमचाच आहे या भ्रमातून आधी बाहेर या”, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी किशोरी पेडणेकर यांना सुनावलं आहे. तसेच, “देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांशी आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलत आहेत. हा साठा २ ते ३ दिवसांमध्ये मुंबईत येण्यासाठी भाजपा देखील प्रयत्न करेल”, असं देखील ते म्हणाले आहेत.

 

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी जरी लसींचा साठा अपुरा पडण्याची शक्यता वर्तवली असली, तरी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी मात्र देशाच्या कोणत्याही भागात करोना लसींचा तुटवडा नसल्याचं दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.