राज्यात गुरुवारी प्रथमच रुग्णसंख्या सहा हजारांहून अधिक झाली. गेल्या २४ तासांत ६३३०  रुग्णांमध्ये करोनाचे निदान झाले.

राज्यात गेले पाच  दिवस पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. प्रथमच सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. तर ८०१८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

राज्यातील रुग्णांची एकू ण संख्या ही १ लाख ८६ हजार झाली आहे. यापैकी एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत करोनामुळे १२५ जण दगावले असले तरी २५ तासांत १५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत १५५४ आणि पुण्यात ७९० रुग्ण आढळले.

मुंबईत गुरुवारी५९०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे करोनामुक्त होण्याचे प्रमाण आता ६३ टक्के झाले आहे. गुरुवारी नवीन १५५४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा ८० हजारांपुढे गेला आहे. गुरुवारी एका दिवसात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ४६८६ झाली आहे. १५५४ नवे रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८०,२६२ झाली आहे. तर एकाच दिवसात मोठय़ा संख्येने रुग्णांना घरी पाठवल्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ५७ वरून ६३ टक्के झाले आहे. आतापर्यंत ५०,६९४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २४,८८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७९८ संशयितांना दाखल रुग्णालयात करण्यात आले आहे.

गेल्या ४८ तासांत ५७ मृत्यूची नोंद झाली असून त्याचा गुरुवारच्या अहवालात समावेश करण्यात आला आहे. गेल्या सुमारे महिन्याभरापासून दररोज आधीच्या जुन्या मृत्यूंची आकडेवारी समाविष्ट केली जात होती. गुरुवारी प्रथमच फक्त ४८ तासांतील मृतांची नोंद अहवालात केली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचे प्रमाण पुन्हा एकदा किंचित वाढला असून सध्या १.७२ टक्के  सरासरी रुग्णवाढ होत आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ४१ दिवस आहे. आतापर्यंत ३ लाख ३९ हजार ७९६ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील करोना रुग्णसंख्या ६ लाख पार

नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णांनी ६ लाखांचा आकडा पार केला असून एकूण रुग्णसंख्या ६ लाख ४ हजार ६४१ झाली आहे. फक्त पाच दिवसांत ५ लाखांवरून ६ लाख रुग्णसंख्या झाली. म्हणजे आठवडाभरापेक्षा कमी काळात रुग्णसंख्या १ लाखांनी वाढली. गेल्या २४ तासांत १९ हजार १४८ नव्या रुग्णांची भर पडली असून ४३४ मृत्यू झाले. एकूण मृत्यूची संख्या १७ हजार ८३४ झाली आहे.