‘आरटीपीसीआर’ चाचणी २४ तासांत करण्याचे आदेश

मुंबई : ‘सिटीस्कॅन’ चाचणीद्वारे निदान केलेल्या करोनाबाधितांच्या उपचारांचा पाठपुरावा, संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि रुग्ण म्हणून नोंदणी होण्यासाठी आता निदान केंद्रांनी (डायग्नोस्टिक सेंटर) स्थानिक प्रशासनाला रुग्णांची माहिती देणे बंधनकारक असेल. तसेच या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी २४ तासांच्या आत करण्याचे आदेश आरोग्य विभागाने अधिसूचनेद्वारे बुधवारी दिले आहेत.

आरटीपीसीआर चाचण्यांबाबतची अविश्वासार्हता आणि पालिकेच्या यंत्रणेचा ससेमिरा टाळण्यासाठी ‘सिटीस्कॅन’ चाचण्यांद्वारे पळवाट काढत करोनाचे निदान करण्याकडे कल वाढत आहे. अशा रुग्णांच्या उपचारांबाबतचा संभ्रम निर्माण होत असल्याचे लोकसत्ताने ‘चाचण्यांतील पळवाटांमुळे उपचारांचा नवा तिढा’ या मथळ्याखाली १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध केले होते.

केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरटीपीसीआर किंवा प्रतिजन चाचणी अहवालात करोनाचे निदान होणे आवश्यक आहे. परंतु राज्यातील काही रुग्णालयांमध्ये ‘सिटीस्कॅन’ चाचणीद्वारे करोनाबाधितांचे निदान करून उपचार केले जात आहेत. यामुळे अशा रुग्णांची नोंद संबंधित यंत्रणेकडे केली जात नाही. तसेच यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि चाचण्याही होत नाहीत. यामुळे संसर्ग प्रसारवाढीचा धोका असल्याने या रुग्णांच्या चाचण्यांबाबतचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. ‘सिटीस्कॅन’चाचणीत चुकीचे निदान केल्याने करोना नसतानाही उपचार केल्याचेही निदर्शनास आल्याचे विभागाने अधोरेखित केले आहे.