शैलजा तिवले

पालिकेच्या तीन औषधविक्रेत्यांना (फार्मासिस्ट) करोनाचा संसर्ग झाला आहे. शहरातील काही फार्मासिस्ट बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना अलग राहावे लागले आहे. तेव्हा फार्मासिस्टनाही विमा कवच द्यावे, अशी मागणी पालिकेच्या फार्मासिस्ट असोसिएशनने केली आहे.

चेंबूरमध्ये काम करत असलेल्या ३५ आणि ४५ वर्षीय फार्मासिस्टना करोनाची लागण झाली आहे, तर कांदिवली येथील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील एका फार्मासिस्टलाही बाधा झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये फार्मासिस्टला पोहचविण्यासाठी केलेल्या बसमधून यातील दोन जण प्रवास करत असल्याने या बसमधील काही फार्मासिस्टला घरी अलग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालिका रुग्णालयात ३५० फार्मासिस्ट कार्यरत आहेत. रुग्णांच्या संपर्कात आम्ही सातत्याने येत असतो. अनेकजण ५० वर्षांवरील असून मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. तेव्हा आमच्या कुटुंबालाही सरकारने विमा संरक्षण द्यावे, असे पालिकेच्या फार्मासिस्ट असोसिएशनने सांगितले.

आरोग्यसेवेतील महत्त्वाचा भाग म्हणून फार्मासिस्ट करोना उद्रेकाच्या काळात अगदी सुरुवातीपासून कार्यरत आहेत. परंतु त्यांच्या कामाची पोचपावतीही त्यांना दिली जात नाही, असे इंडियन फार्मासिटय़ुकल असोसिएशनच्या (आयपीए) डॉ. मंजिरी घरत सांगतात.

टाळेबंदीमुळे औषधांचा पुरवठा दुकानांपर्यंत केला जात नाही. वितरकांकडे जाऊन औषधे आणावी लागतात. तसेच माल विकत घेताना लगेचच मालाचे पैसेही द्यावे लागतात. त्यामुळे दुकान चालविणे अडचणीचे होत असल्याचे  ठाण्यातील एका औषधविक्रेत्याने सांगितली.

पालिकेच्या १२ सुरक्षारक्षकांना लागण

पालिकेच्या सुरक्षा विभागातील तब्बल १२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. यापैकी आठ सुरक्षारक्षक हे नायर रुग्णालयात कर्तव्यावर होते.  पालिकेची कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची प्रवेशद्वारावरच तपासणी, चौकशी करणे ही कामे सुरक्षारक्षक करत आहेत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांशी त्यांचा सगळ्यात आधी व वारंवार संपर्क येतो. त्यामुळे साहजिकच त्यांना या आजाराचा विळखा बसला आहे. हे बहुतांशी कर्मचारी मुंबई बाहेर राहत असून ते कामासाठी रोज मुंबईत येण्याची कसरत करतात, अशी माहिती प्रमुख सुरक्षा अधिकारी विनोद बाडकर यांनी दिली.  करोनाबाधित आठ सुरक्षा रक्षक  नायर रुग्णालयात, दोन कस्तुरबा रुग्णालयात, एक सेव्हन हिल्समध्ये  दाखल आहे.