|| शैलजा तिवले

करोनाबाधितांमध्ये ५० वर्षांवरील व्यक्तींची संख्या अधिक; बहुतांश रुग्णांना मध्यम लक्षणे

मुंबई : शहरात दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या करोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा जवळपास हजाराच्या घरात पोहोचल्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णालयातील बहुतांश रुग्ण ५० वर्षांवरील असून त्यांना मध्यम स्वरूपाची लक्षणे असल्याचे अहवालावरून दिसून येत आहे.

मुंबईत करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असून आठवडाभरात रुग्णसंख्या चौपटीने वाढली आहे. दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तीनशेवरून पुन्हा हजारापर्यंत वाढल्याची नोंद आहे. त्यामुळे मुंबईतील करोना रुग्णालयातील खाटा पुन्हा भरू लागल्या आहेत.

सेव्हनहिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले की, ‘मुंबईतील मोठे करोना रुग्णालय असल्याने आत्तापर्यंत दरदिवशी जवळपास ३५ ते ४० रुग्ण दाखल होत होते. परंतु या आठवड्यात ही संख्या ७० ते ८० पर्यंत पोहोचली आहे. गेल्या पाच दिवसांत ३५० रुग्ण दाखल झाले असून रुग्णांचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. सध्या ८०० हून अधिक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.’

रुग्णसंख्या कमी झाल्याने चार विभाग सुरू ठेवले होते. परंतु मागील चार दिवसांत रुग्णांचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे आणखी दोन विभाग सुरू केले आहेत. यातील पाच टक्के रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे असून, इतरांना सौम्य ते मध्यम लक्षणे आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी मृतांचे प्रमाण कमीच आहे, अशी माहिती वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीके सी) करोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली.

करोनाव्यतिरिक्त उपचार सुरू केल्याने हजार खाटांपैकी फक्त ४५ खाटा करोनासाठी राखीव ठेवल्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णांना सेव्हनहिल्स किंवा वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये पाठवत आहोत. या करोना रुग्णालयांमध्ये अनेक खाटा रिक्त आहेत. संसर्गाचे प्रमाण वाढल्यास पुन्हा करोना रुग्णालयात रूपांतरण करावे का याचा विचार केला जाईल, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

रुग्णांची संख्या जवळपास दुपटीहून अधिक वाढली आहे. गेल्या आठवड्यात जवळपास दरदिवशी २० रुग्ण येत होते. गेल्या चार दिवसांत हे प्रमाण ३५ वर गेले आहे. सध्या रुग्णालयात १७० रुग्ण दाखल आहेत. रुग्ण कमी झाल्याने मनुष्यबळ कमी केले होते. परंतु आता रुग्णसंख्या वाढत असल्याने १० ते १५ टक्के मनुष्यबळ पुन्हा वाढवावे लागण्याची शक्यता आहे. औषधांसह बाकी व्यवस्था उपलब्ध आहे, असे मुलुंड करोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे यांनी सांगितले.

‘पाचशे रुग्णांच्या दृष्टीने मनुष्यबळ राखीव ठेवले होते. त्यामुळे मनुष्यबळाची सध्या कमतरता नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदत वाढविलेली नाही. त्यामुळे गरज लागल्यास त्यांना पुन्हा बोलाविता येऊ शकते,’ असे डॉ. डेरे यांनी सांगितले.

किती खाटा रिक्त?

मुंबईत सध्या पालिकेच्या रुग्णालयांत २,४६३ खाटा आणि खासगी रुग्णालयांत ८२७ खाटा रुग्णांनी भरलेल्या आहेत. पालिका रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात ३२०, तर खासगी रुग्णालयांत २३६ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील ११ हजार खाटांपैकी पालिका रुग्णालयांत ६२१९ खाटा, तर खासगी रुग्णालयात १६९६ अशा एकत्रित ७९१५ खाटा सध्या रिक्त आहेत.

गेल्या आठवड्यात मुंबईत १९९८ रुग्णांचे नव्याने निदान झाले होते. या आठवड्यात ४७७६ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. गेल्या आठवड्यात ७७ मृत्यूची नोंद होती, तर या आठवडाभरात मृतांमध्ये घट झाली असून २५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

काय कराल?

बहुतांश रुग्ण ५० वर्षांवरील असून, सध्या तरी मध्यम लक्षणे असलेले रुग्ण अधिक आहेत. परंतु काही रुग्णांमध्ये त्रास झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मध्यम लक्षणे असली तरी रुग्णांनी घरामध्येच उपचार न घेता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि रुग्णालयात दाखल व्हावे, असे डॉ. अडसूळ यांनी सांगितले.