नवी मुंबईत दिवसागणिक करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून बुधवारी ५४ नवे रुग्ण वाढले आहेत. यामुळे शहरात करोनाबाधितांची संख्या ९१० झाली आहे. मागील दोन दिवसांपासून करोनाबाधितांचे नवे रुग्ण कमी आढळत असल्याने रुग्णांची संख्या सातत्याने कमी होण्यासाठी पालिका सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

शहरात बुधवारी एका दिवसात ५४ रुग्ण आढळले असून मागील दोन दिवसांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.परंतू पुढील दोन दिवसातच मुंबईतील करोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या पार होणार असल्याचे चित्र आहे. शहरात बुधवारी बेलापूरमध्ये २, नेरुळमध्ये २, तुर्भेत १४, वाशीत ११, कोपरखैरणेत १०, घणसोलीत ५, ऐरोलीत ९ व दिघ्यामध्ये १ रुग्ण सापडला आहे. दुसरीकडे पालिकेच्या आपत्कालिन विभागातील एका कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे मुख्यालय कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. परंतू कर्मचाऱ्याचा करोना चाचणी अहवाल संदिग्ध आहे.

१०० टक्के उपस्थिती अनिवार्य…
नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पालिकेतील कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.