शैलजा तिवले लोकसत्ता,

मुंबई: करोनाची बाधा झाल्यानंतर निर्माण झालेली भीती, दडपण यांमुळे जवळपास दहा टक्के रुग्णांमध्ये मानसिक ताणतणाव निर्माण झाल्याचे वांद्रे-कुर्ला येथील करोना आरोग्य केंद्रात आढळले आहेत. तर करोनामुक्त झाल्यानंतर मानसिक ताणतणाव आल्याने जवळपास आठ ते दहा रुग्ण दरदिवशी उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागात येत आहेत.

करोना आजाराबाबत होणाऱ्या उलटसुलट चर्चा, अवैज्ञानिक माहितीचा प्रसार आणि समाजाकडून रुग्णांना मिळणारी वागणूक यामुळे रुग्णांमध्ये आजाराबाबत भीती निर्माण होण्यासह अनेक मानसिक ताणतणाव आढळले. म्हणून बीकेसी करोना आरोग्य केंद्रात मानसिक आजारांवरही सेवा सुरू केली गेली. रुग्णालयात आतापर्यंत ४ हजार रुग्णांची तपासणी केली आहे. यातील जवळपास १० टक्के म्हणजेच ४०० रुग्णांमध्ये मानसिक ताणतणाव निर्माण झाला होता. यात सुमारे २ टक्के मनोरुग्ण होते. परंतु ८ टक्के रुग्णांना करोनाबाधेनंतर मानसिक ताणतणाव, नैराश्य, भीती, चिंता निर्माण झाली होती. परंतु वेळेत निदान आणि उपचार केल्याने हे रुग्ण बरे होऊन सुखरूप घरीही गेले. बहुतांश रुग्ण ५०-५५ वयोगटातील होते. तपासणी केलेल्यातील २२ टक्के रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशनही रुग्णालयात केले आहे, असे या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांनी सांगितले.

करोनामुक्त होऊन घरी गेल्यानंतरही काही रुग्णांना मानसिक तणाव निर्माण झाल्याचे आढळत आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज येणाऱ्या मनोरुग्णांपैकी जवळपास ५० टक्के रुग्ण हे अशाप्रकारचा त्रास झाल्याने येत आहेत. रुग्णांची घरी गेल्यावर कुटुंबीयांनी केलेली अतिकाळजी, गृहसंकुलात घराबाहेर न पडण्याबाबत वारंवार दिले जाणारे सल्ले, आजार झाला कसा, रुग्णालयात कसे वाटले याबाबती वारंवार होणारी विचारपूस यांमुळे त्रास होत असल्याचे रुग्णांनी नोंदविले. काही रुग्णांना बरे झालो तरी घरच्यांना आता होईल का, मला पुन्हा बाधा होईल का ही भीतीदेखील असल्याचे आढळते.

अतिदक्षता विभागात उपचार घेतलेल्या काही रुग्णांना सर्व प्रक्रियेबाबतचा धक्कादेखील बसल्याचे आढळते. थोडेदेखील चालल्यास फुप्फुसावर ताण येईल का, छातीचे ठोके थांबले आहेत का, थोडाही त्रास झाल्यास आजार पुन्हा वाढला आहे का, अशी भीती त्यांच्यात आढळते. या रुग्णांना समुपदेशनासह औषधे देऊन हळूहळू ही भीती कमी केली जाते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वाणी कुल्हाळी यांनी सांगितले.

‘करोनाची बाधा झालीच कशी?’

सुरुवातीच्या काळात करोनाची बाधा झालीच कशी, आता माझे काय होईल, अशी चिंता काही रुग्णांमध्ये होती. तर काही रुग्णांमध्ये हा सरकारचा कट आहे, खोटे अहवाल दाखवून डांबून ठेवले आहे, पैसे काढण्यासाठी रुग्णालयांचा डाव आहे , अशा विचारांमुळे आजार झाल्याचे मान्य केले जात नव्हते. अशा विविध प्रकारच्या विचारांनी दडपण आल्याने या रुग्णांना शांत करण्यासाठी समुपदेशनासह औषधोपचारही सुरू करावे लागले. ऑक्टोबरनंतर मात्र मानसिक ताणतणाव आढळलेल्या रुग्णांमध्ये करोनाची बाधा झालीच कशी, अशा विचारांनी तणाव येत असल्याचे आढळले.

रुग्णालयात तीन महिन्यांपासून मानसिक आरोग्य सेवा दिली जात आहे. येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची मानसिक तपासणी केली जाते. संशयित लक्षणे किंवा आधी मानसिक आजार असल्याचे आढळल्यास त्यादृष्टीने उपचारांची दिशा ठरविली जाते. यासाठी रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांसह मानसशास्त्रज्ञ आणि वैद्यकीय समाजसेवकांची नियुक्ती केली आहे. वेळीच निदान आणि उपचार सुरू केल्याने या रुग्णांना हाताळणे सोपे गेले आणि संभाव्य हानी टाळता आली.

– डॉ. राजेश ढेरे, अधिष्ठाता, बीकेसी करोना आरोग्य केंद्र

मनोरुग्णांना असा फायदा

आधीपासून मानसिक आजार असूनही औषधोपचार न घेतलेल्या रुग्णांमध्ये करोना उपचारादरम्यान त्यांना असलेल्या मानसिक आजाराबाबतची माहिती देणे, समुपदेशन करणे आणि औषधे घेण्यास लावणे यांमुळे रुग्णांनाच मानसिक आजाराची औषधे घेणे किती आवश्यक आहे हे समजले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होऊन जाताना ही औषधे आम्ही आधीपासून घ्यायला हवी होती, असे आर्वजून सांगतात. त्यांचे कुटुंबीयही रुग्णाने औषधे सुरू केल्याने सुटकेचा नि:श्वास टाकत असल्याचा अनुभव डॉ. कुल्हाळी यांनी व्यक्त केला.