लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून मुंबईत रेल्वेने दाखल झालेल्या हजारो प्रवाशांच्या करोना तपासणीच्या पहिल्या दिवशीच्या अनुभवातून बोध घेत सावरलेल्या रेल्वे आणि पालिका यंत्रणांमुळे स्थानकांवर कालच्या पेक्षा ‘आजचा गोंधळ बरा होता’चे वातावरण होते.

लांब पल्लय़ाच्या रेल्वे गाडय़ांतून प्रवास करून मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांची गुरुवारी, दुसऱ्या दिवशी ही मुंबईतील रेल्वे स्थानकांवर तपासणी करण्यात आली. गुरुवारी तुलनेत कमी प्रवाशांची प्रतिजन चाचणी करण्यात आली. स्थानकात दाखल झालेल्या प्रवाशांच्या शरीराचे तापमान मोजून त्यातील के वळ संशयितांचीच चाचणी करण्यात येत होती. तसेच प्रवाशांना ताटकळत राहावे लागू नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

वांद्रे जंक्शन स्थानकात गुरुवारी दुपारी पश्चिम एक्स्प्रेस गाडीने दाखल झालेल्या २४० प्रवाशांपैकी फक्त सहा प्रवाशांचीच प्रतिजन चाचणी करण्यात आली. यातील कोणालाही करोनाची लागण झाली नव्हती. उर्वरित प्रवाशांकडे करोना चाचणी अहवालाची विचारणा न करताच फक्त शरीराचे तापमान मोजून घरी जाण्याची परवानगी दिली जात होती. त्यामुळे स्थानकात दाखल झालेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी फार काळ ताटकळत थांबावे लागत नव्हते.

बहुतांश प्रवासी कुटुंबकबिल्यासह स्थानकात उतरत होते, तर कामानिमित्त येणाऱ्यांची संख्याही मोठी होती. राहुल नावाचा तरुण दिल्लीवरून कामाच्या शोधात वांद्रे स्थानकात दाखल झाला होता. करोना चाचणी अहवालाबाबत विचारणा करताच त्याने चाचणी केली नसल्याचे सांगितले. तसेच मुंबई स्थानकात चाचणी होणार असल्याने दिल्लीत चाचणी करून येण्याची गरज भासली नाही, अशी माहितीही त्याने दिली.

४०० जणांकडे अहवाल

मुंबई सेंट्रल स्थानकातही दुसऱ्या दिवशी सुमारे ३२०० प्रवाशांचे  तापमान मोजण्यात आले. प्रवासांना विलंब होऊ नये यासाठी मुंबई सेंट्रल येथे गुरुवारी तापमान मोजण्यासाठी चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, तर दोन वैद्यकीय कक्षांवर करोना चाचणी केली जात होती. यातील २४५ जणांची प्रतिजन चाचणी केली असता कोणालाही करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले नाही, अशी माहिती साहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली, तर ४०० हून अधिक प्रवाशांकडे करोना चाचणी अहवाल होते, असेही ते म्हणाले.

रेल्वे स्थानकांवरील चाचणी शुल्क ऐच्छिक

मुंबई : दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईतील सहा रेल्वे स्थानकांवर तपासणी करण्यात येत असून लक्षणे आढळल्यास त्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीचे पैसे वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र आता प्रवाशाची इच्छा असल्यास पैसे स्वीकारावे, असे मौखिक आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

करोनाच्या साथीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने करोना चाचणी करूनच यावे. चाचणीमध्ये करोनाची बाधा झाली नसेल तरच प्रवास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. या चारही राज्यांतून मोठय़ा संख्येने नागरिक मुंबईत येतात. बोरिवली, दादर, कुर्ला, वांद्रे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे स्थानकांवर ते उतरतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी आणि करोना चाचणीसाठी पालिकेची पथके तैनात करण्यात आली आहेत. चाचणी न करता येणाऱ्या अथवा करोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांची पालिकेकडून रेल्वे स्थानकांवरच प्रतिजन चाचणी करण्यात येत आहे.

प्रतिजन चाचणीसाठी प्रवाशांकडून ३०० रुपये शुल्क घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र आता या निर्णयावरून घूमजाव करण्यात आले आहे. प्रवाशी चाचणी केल्यानंतर स्वत:हून पैसे द्यायला तयार असतील तर ते स्वीकारावे अन्यथा पैसे घेऊ नये असे मौखिक आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.