धारावी, दादर, माहीममध्ये दीड हजार रुग्ण; सहा विभागांमध्ये प्रत्येक एक हजाराहून अधिक रुग्ण

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : सुरुवातीच्या काळात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे धोकादायक बनलेल्या वरळी, भायखळा या परिसरांतील साथ काही प्रमाणातआटोक्यात येत असताना मुंबईतील सहा विभागांमध्ये करोनाची काजळी गडद होत चालली आहे. दादर, माहीम, धारावी या मध्य मुंबईतील परिसरात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली असून अंधेरी, शीव या भागांतही करोनाचे संकट तीव्र होत चालले आहे.

मुंबईमधील वरळी परिसरातील कोळीवाडा, जिजामाता नगर, बीडीडी चाळीत सुरुवातीपासून करोनाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर भायखळ्यातही मोठय़ा संख्येने नागरिकांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे वरळीपाठोपाठ भायखळाही पालिकेसाठी धोकादायक बनला. आताही इथला धोका कमी झालेला नाही. मात्र गेल्या महिनाभरात धारावीत करोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

आजघडीला धारावीने वरळी आणि भायखळ्यालाही मागे टाकले आहे.

मुंबई महापालिकेकडून उपलब्ध झालेल्या ११ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील धारावी, दादर आणि माहीम परिसरातील रुग्णसंख्या तब्बल १४७० वर पोहोचली होती. त्याखालोखाल ‘ई’ विभाग कार्यालयाच्या अखत्यारितील भायखळा, नागपाडा आणि आसपासच्या परिसरात १,३५९, ‘जी दक्षिण’मधील वरळी, कोळीवाडा, जिजामाता नगर, बीडीडी चाळीचा परिसरातील रुग्ण संख्या १२८१, तर ‘एफ उत्तर’मधील माटुंगा, शीव आणि आसपासच्या परिसरात १२७९ वर पोहोचली आहे. ‘के पश्चिम’ विभागातील अंधेरी, विलेपार्ले आणि जोगेश्वरी परिसरातही धोक्याची घंटा वाजू लागली असून ११ मे रोजी येथील रुग्णसंख्या ११५९ वर पोहोचली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व आणि आसपासच्या परिसरातील (एच पूर्व) रुग्ण संख्या १०२६ वर पोहोचली आहे.दरम्यान, विभाग कार्यालयांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आकडेवारीबाबत साशंकता आहे. काही अज्ञात वा अन्य परिसरातील रुग्णांची नोंद आपल्या विभागात झाल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचा दावा या अधिकाऱ्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर केला. रुग्णांचा नंबर आणि पत्ता दिला जातो. परंतु प्रत्यक्षात तो रुग्ण त्या भागातील रहिवाशी नसतो अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

आर उत्तरमध्ये ११६ रूग्ण

या सर्व परिसरांमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना पालिकेच्या ‘आर उत्तर’ परिसरातील दहिसरमध्ये मात्र ११ मेपर्यंत ११६ करोनाचे रुग्ण आढळून आले. वरळी, भायखळ्यात करोनाचा संसर्ग वाढू लागताच दहिसरमधील झोपडपट्टय़ांमध्ये निर्जंतुकीकरण, स्वच्छता, नागरिकांची तपासणी यावर भर देण्यात येत होता. मुंबईच्या अन्य परिसरात झपाटय़ाने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे तूर्तास तरी ‘आर उत्तर’ परिसरातील चित्र दिलासादायक आहे. मात्र नागरिकांच्या स्वैरसंचारावर बंधन न घातल्यास हा परिसरही वरळी, भायखळा, धारावीच्या मार्गावर जायला वेळ लागणार नाही.

विभागवार रुग्णसंख्या

’ ‘जी-उत्तर’ विभाग (धारावी, दादर, माहीम) – १४७०

’ ‘ई’ विभाग (भायखळा, नागपाडा) – १,३५९

’ ‘जी दक्षिण’ विभाग (वरळी, कोळीवाडा, जिजामाता नगर, बीडीडी चाळ) – १२८१

’ ‘एफ उत्तर’ विभाग (माटुंगा, शीव ) – १२७९

’ ‘के पश्चिम’ विभाग (अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी) – ११५९

’ ‘एच पूर्व’  विभाग (वांद्रे पूर्व) – १०२६

’ ( मुंबई महापालिकेने दिलेल्या ११ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार )