करोना विषाणूच्या संकटाविरोधात देशभरातील प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर लढत असताना काही विघ्नसंतोषी लोक बनावट मेसेज पसरवत आहेत. अशाच प्रकारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावे काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून, या क्लिप्स बनावट असल्याचे सांगत त्या फॉरवर्ड करु नयेत असे आवाहनही सर्वसामान्य जनतेला केले आहे.

यासंदर्भात मुंबई पोलिसांनी ट्विट केले असून यात म्हटले की, “सोशल मीडियावर फिरणारी एक बाब आमच्या लक्षात आली आहे की, मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या नावे आणखी एक ऑडिओ मेसेज व्हायरल झाला आहे. काल व्हायरल झालेल्या मेसेजप्रमाणेच हा देखील आहे. ही दोन्ही ही ऑडिओ मेसेज पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे नाहीत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की ते पुढे फॉरवर्ड करु नका”