मुंबई : करोनाची भीती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. अशातच एका करोना बाधित रुग्णामुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नऊ डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचारी मिळून १४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करावे लागल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

राज्यात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालये असून, यापैकी नागपूर येथे दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यातील ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर’ येथे पक्षाघाताच्या उपचारासाठी दाखल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला करोना झाला होता. त्याच्या घरातील अन्य एक व्यक्ती करोना बाधित होती. मात्र ही माहिती नंतर उघडकीस आली. डॉक्टरांना याची माहिती मिळताच सदर रुग्णाची करोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नऊ डॉक्टरांसह वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिका व अन्य कर्मचारी अशा चौदा जणांना तात्काळ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याचे येथील एका डॉक्टरने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. सदर पक्षाघात झालेला रुग्ण हा रुग्णालयातील सामान्य रुग्णांसाठीच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये उपचारासाठी दाखल झाला होता व तेथे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. आता या १४ही जणांची करोना चाचणी करण्यात येईल असेही या डॉक्टरांनी सांगितले. या वैद्यकीय महाविद्यालयात करोना रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड असून तेथे करोना बाधितांवर उपचार केले जातात. तेथे उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना करोना संरक्षणासाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. तथापि या घटनेमुळे यापुढे आम्हाला अधिक सावधानता बाळगावी लागेल, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. नेमक्या याच भीतीपोटी राज्यातील खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्याअनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने व नर्सिंग होम बंद ठेवले आहेत.

याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना विचारले असता, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नऊ डॉक्टरांसह १४ जणांना विलगीकरण कक्षात ठेवल्याचे त्यांनी मान्य केले तसेच डॉक्टरांच्या व रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. करोनावर उपचार करताना कोणती काळजी घ्यायची याचे विशेष प्रशिक्षण आम्ही सर्वच्या सर्व म्हणजे १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिका व संबंधितांना दिले असून, आज हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करोनावरील उपचारांसाठी २ हजार २५० खाटा तयार करण्यात आल्या आहेत. ३९० खाटा अतिदक्षता विभागासाठी राखीव आहेत. सध्या आमच्याकडे २२२ व्हेंटिलेटर असून आणखी २०० व्हेंटिलेटर येत्या काही दिवसात येतील. एन-९५ चे एकूण ३९,९३३ मास्क आहेत, तर थ्री लेअरचे ३१ लाख १० हजार मास्क आहेत. याशिवाय एचआयव्ही रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणारे ६२,००० ड्रेस आहेत तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्युपमेंट ( पीपीइ) चे ३६०९ ड्रेस असून जेजे रुग्णालयात आज ५००० पीपीइ ड्रेस घेण्यात आले. याशिवाय हाफकीन खरेदी महामंडळाच्या माध्यमातून आणखी ४० हजार पीपीइ ड्रेस घेतले जात असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. पीपीइ सुट कोणी वापरावा याबाबत आयसीएमआर च्या सुस्पष्ट गाईडलाईन आहेत. खाजगी डॉक्टरांनाही त्यांची माहिती खुली आहे. करोनावर थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच हे पीपीइ सुट द्यावे असे आसीएमआरने म्हटले आहे. त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी मास्कसह आवश्यक ती काळजी घेऊन आपली रुग्णसेवा सुरू ठेवली पाहिजे, असेही डॉ. लहाने यांनी सांगितले.