करोना चाचणी आणि विलगीकरण सक्तीचे करणार

मुंबई / नाशिक : हरिद्वारच्या कुंभमेळ्यात लाखोंच्या गर्दीमुळे करोनाची साथ पसरण्यास सुरुवात झाल्याने राज्य सरकार सतर्क  झाले असून महाराष्ट्रातून गेलेल्या भाविकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. आपापल्या भागातून हरिद्वारला गेलेल्यांची माहिती घेऊन ते परतल्यावर त्यांची करोना चाचणी करणे आणि विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करावी, असा आदेश राज्यातील प्रशासन-पोलीस यंत्रणेला देण्यात आला आहे. कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांची एकत्रित माहिती ठेवण्याची परंपरा नसल्याने या भाविकांचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.

कुंभमेळ्यात करोनाची साथ वेगाने पसरली आहे. लाखो भाविकांची गर्दी असल्याने कोणालाही करोना झालेला असू शकतो. ही सर्व मंडळी आपापल्या भागात परतल्यावर हजारो लोकांना लागण होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणा सतर्क  झाली आहे. महाराष्ट्रात नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरत असल्याने तिथे काही आखाडे आहेत. शिवाय राज्यातील विविध भागांतून भाविक कुंभमेळ्याला जातात. नाशिकमधून एकत्रित माहिती मिळण्याची थोडी सोय असली तरी एकूण राज्यभरातून किती लोक गेले याची कसलीही अधिकृत आकडेवारी नसते. त्यामुळे आता कुंभमेळ्याहून येणाऱ्या भाविकांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर या कुंभनगरीतील वैष्णव आणि शैवपंथीय आखाडे, आश्रम यातून महंत, महामंडलेश्वर, साधू, शिष्य असे ५० ते ६० जण हरिद्वार येथील कुंभमेळ्यात सहभागी झाल्याचा अंदाज आहे. राज्यातील ही संख्या अंदाजे ५०० ते १००० असू शकते, असे आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत भक्तीचरण दास यांनी सांगितले. यात स्थानिक पातळीवरील दिगंबर आखाडा, लक्ष्मी नारायण मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाडे, मुंबई येथील खालसा परिषद, वारकरी संप्रदायातील साधू-महंतांचा समावेश आहे. काही हवाईमार्गे, तर कुणी रस्ता, रेल्वेमार्गाने हरिद्वारला गेले. वाढत्या करोनामुळे या वेळी कुंभमेळ्यात जाणाऱ्यांची संख्या तशी बरीच कमी होती. काही महंतांनी जाणे टाळले. करोना पसरू लागल्याने तिथे गेलेल्या साधू-महंतांना तातडीने निघून येण्यास सांगण्यात आल्याचे भक्तीचरण दास यांनी नमूद केले. या कुंभमेळ्यातील दोन शाही स्नान झाले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास स्थानिक प्रशासन स्थानिकांना आरोग्य सेवा देईल की बाहेरून आलेल्यांना, याची जाणीव संबंधितांना करून देण्यात आल्याचे ते म्हणाले.

दुसरीकडे यंत्रणेने हरिद्वारला गेलेल्या साधू-महंतांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याशी संपर्क साधून ते कसे परत येणार आहेत, याची माहिती मिळवली जात आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील आखाड्यांमधून २७ ते ३० साधू-महंत हरिद्वारला गेल्याचा अंदाज आहे. संबंधितांची माहिती संकलित करण्यात आली आहे. हरिद्वारवरून ते कसे परतणार, याची माहिती घेतली जात आहे. ते परतल्यानंतर प्रथम त्यांची करोना चाचणी केली जाईल आणि नंतर त्यांना विलगीकरणात राहावे लागेल, असे नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

कुंभमेळ्याला नाशिकसह राज्यभरातून अनेक साधू-महंत, शिष्य आणि भक्त मंडळी जातात; पण त्यांची एकूण संख्या किती याची माहिती उपलब्ध नाही. कुंभमेळ्यात करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहता तेथून राज्यात येणारी मंडळी करोनाचे वाहक ठरू शकतात हा धोका आहे. त्यामुळे आपापल्या जिल्हा-तालुक्यातून कुंभमेळ्याला गेलेल्या यात्रेकरूंची माहिती तातडीने गोळा करावी. ते कसे परत येत आहेत याचा शोध घ्यावा आणि ते परत येताच सर्वप्रथम त्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी आणि त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवावे, असा आदेश राज्यातील प्रशासन व पोलीस यंत्रणेला देण्यात आला आहे.  – विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसनमंत्री