गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असून अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र सध्या करोना विषाणूचे संकट अधिक गडद बनू लागल्याने यावर्षीचा गणेशोत्सव नेमका कसा साजरा होईल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. सर्व गणेशभक्तांचं सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलं होतं. दरम्यान करोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून मंडळांनी निर्णय मान्य करणार असल्याचं सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आगामी गणेशोत्सवातील कायदा, सुव्यवस्था संदर्भात व्हिसीद्वारे आढावा बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराजे देसाई तसंच राज्यातील गणेश मंडळाचे व मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

“आपण राज्यात पुनःश्च हरि ओम करून प्रत्येक पाऊल सावधतेने टाकत आहोत. परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावे लागेल. जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू, यासाठी कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितंल.  “गणेश मंडळांच्या मार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

दरम्यान सरकारचा निर्णय येण्याआधीच अनेक मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच आगमन सोहळेही रद्द केले आहेत. मुंबईतील प्रसिद्ध चिंतामणी गणेश मंडळाने आगमन सोहळा रद्द केला असून मंडपातच गणेशमूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरवणुकांना परवानगी नाही
एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात येत आहे.

मूर्तिकारही अडचणीत
दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून १० फूट, १२ फूट व इतर मोठमोठय़ा गणेश मूर्ती घडविण्याचं काम हे कलाकार करीत असतात. रंगरंगोटी, हिरे सजावट व इतर सजावटीची कामे केली जातात. यातून या कलाकारांना चांगली कमाई होत असते. मात्र यंदाच्या वर्षी करोनाच्या संकटामुळे बहुतांश मंडळांनी मोठय़ा मूर्ती न ठेवता लहानच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतल्याने या कलाकारांना मोठय़ा मूर्त्यां बनविण्यासाठीच्या ऑर्डर मिळणार नसल्याने याचा परिणाम मूर्ती घडविणाऱ्या कलाकारांवरही झाला आहे.