देशामधील कोरनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. हा लॉकडाउन काही दिवसांमध्ये संपणार आहे. मात्र या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये आत्यावश्यक सेवा सुरुच आहेत. देशभरातील पोलिसही लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करुन रस्त्यावर येणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेत आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्याप्रमाणे पोलीस रस्त्यावर उतरले आहेत त्याचप्रमाणे ऑनलाइन माध्यमांवर म्हणजेच सोशल नेटवर्किंगवरही पोलिसांनी आपली डिजीटल फौज सज्ज केली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर पोलिसांच्या सोशल नेटवर्किंग अकाऊण्टवरुन नागरिकांना घरातच राहण्यासंदर्भातील आवाहन केलं जात आहे. मात्र हे आवाहन करताना सरकारी भाषा न वापरता नेटकऱ्यांना प्रिय असणारी मिम्स आणि मजेदार पद्धतीचा पोलिसांनी अवलंब केला आहे. मुंबई पोलिसांनी नुकत्याचं केलेल्या एका आवाहनामध्ये चक्क लोकप्रिय कार्टून कॅरेक्टरचा वापर केला आहे.

मुंबई पोलिसांनी १० एप्रिल रोजी केलेल्या ट्विटमध्ये ‘पॉवर पफ गर्ल्स’ या नव्वदच्या दशकात लोकप्रिय झालेल्या कार्टूनमधील व्हिलन म्हणजेच ‘मोजो जोजो’चा संदर्भ देत नागरिकांना करोनापासून सावध राहण्यास सांगितलं आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटवरुन “‘मोजो जोजो’ हा करोनापेक्षा वाईट आहे. मात्र तो आमच्या बाजूने आहे. तो करोनाशी लढाईत आमच्या बाजूने लढत आहे,” असं म्हटलं आहे. या ट्विटमध्ये पोलिसांनी ‘मोजो जोजो’चे चार फोटो पोस्ट केले आहेत.

पहिल्या फोटोमध्ये लोकं सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत आहे असं सांगितल्यानंतर ‘मोजो जोजो’ त्याच्या शैलीत ‘हे सर्वात सुरक्षित उपाय आहे,’ असं म्हणता दिसतो. या कार्टूनमध्ये ‘मोजो जोजो’चा ‘दॅट्स द इव्हिलेस्ट थिंग आय कॅन इमॅजीन’ हा लोकप्रिय संवादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हे हटके पोस्टर बनवलं आहे.

नक्की वाचा >> बॉलिवूडमधील कलाकार म्हणाले ‘सुपर हिरो तर मुंबई पोलीस…’; मुंबई पोलिसांंनी दिले भन्नाट फिल्मी रिप्लाय


दुसऱ्या फोटोमध्ये ‘मोजो जोजो’ संपालेला दाखवण्यात आला आहे. यामधून पोलिसांनी चुकीची माहिती फॉर्वड करु नका असा संदेश दिला आहे. “चुकीची माहिती फॉर्वड करण्याची शिक्षा भोगावी लागेल,” असं संपातलेला ‘मोजो जोजो’ सांगत आहे.

तिसऱ्या फोटोमध्ये ‘मोजो जोजो’ खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना इशारा देताना दिसत आहे. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल यावर ‘मोजो जोजो’ “ही गोष्ट तुम्ही कधीच विसरू नका”, असं ओरडून सांगताना दिसत आहे.

चौथ्या फोटोमध्ये तर ‘मोजो जोजो’ तोंडाला मास्क लावून दाखवण्यात आला आहे. जेव्हा तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही तेव्हा तुम्ही सुरक्षेशिवाय फिरत असता हे लक्षात घ्या असं ‘मोजो जोजो’ सांगताना दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांनी अशाच आगळ्यावेगळ्या पद्धतीने करोनाच्या लढाईसंदर्भातील समाजप्रबोधन सुरु ठेवलं आहे. बुधवारी मुंबई पोलिसांनी ट्विट केलेल्या एका व्हिडिओवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी रिट्विट करत पोलिसांचे आभार मानले आहेत. या व्हिडिओमध्ये लॉकडाउनच्या काळात पोलीस सारं काही विसरून कशापद्धतीने काम करत आहेत हे दाखवण्यासाठी, ‘मला २१ दिवस सुट्टी असती तर मी काय केलं असतं?’ या प्रश्नावर ‘ऑन ड्युटी’ पोलिसांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.