01 October 2020

News Flash

Coronavirus :रुग्णसंख्या वाढली तरी मृत्यूदर नियंत्रित!

लोकसंख्येची घनता लक्षात घेता मृत्यूदर नियंत्रित असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे

संदीप आचार्य
मुंबई: जगातील अनेक देशांच्या तुलनेत भारतातील करोनाची परिस्थिती निश्चितपणे नियंत्रणात आहे. खासकरून महाराष्ट्र व मुंबईत रुग्णांची व मृतांची आकडेवारी देशाचा विचार करताना जास्त दिसत असली तरी लोकसंख्येची घनता लक्षात घेता मृत्यूदर नियंत्रित असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जगातील अनेक देशात करोनाचा मृत्यू दर ६ टक्के एवढा असताना आपल्याकडे ३. ७ टक्के एवढा मृत्यूदर आहे. योग्य वेळी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय त्याची अंमलबजावणी तसेच आरोग्य व्यवस्थेसह केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आपण मृत्यूदर नियंत्रणात ठेवू शकलो असे सरकारने राज्यातील करोना मृत्यू रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या ‘मृत्यूंचे विश्लेषण’ ( डेथ ऑडिट)समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. मुंबईतील व राज्यातील करोना रुग्णांची आकडेवारी देशातील अन्य कोणत्याही राज्यातील आकडेवारीच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. महाराष्ट्रात २७ हजाराहून तर मुंबईत १६ हजाराहून जास्त करोना रुग्ण आहेत. राज्यात एकूण १०१९ मृत्यूंपैकी ६२१ मृत्यू हे मुंबईत झाले असून यात कोमॉर्बिडिटी म्हणजे मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार, श्वसन विकार आदी आजार असलेल्यांचे प्रमाण जवळपास ७० टक्यांपेक्षा जास्त आहे.

“मुंबई महापालिकेने याची दखल घेऊन अतिदक्षता विभागातील खाटांचे प्रमाण वाढवणे, अशारुग्णांवरील उपचारात एकवाक्यता तसेच वेळेत दाखल करून उपचार करणे सुरु केले आहेत” डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. “मे अखेर व जूनमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल असे सांगतानाच करोनासह जगण्यास आता आपण तयार राहिले पाहिजे” असेही डॉ. सुपे म्हणाले.

“करोनाचे बहुतेक मृत्यू हे मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा तसेच थायरॉईड असलेल्या म्हणजेच कोमॉर्बिडिटीच्या रुग्णांचे झाल्याचे दिसून येते असे मुंबईतील करोनाच्या लढाईसाठी शासनाने नेमलेल्या कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. आगामी दोन-तीन आठवडे करोनाची साथ पसरण्याच्या दृष्टीने महत्वाची असून लोकांनी लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. मास्क लावणे व सोशल डिस्टंसिंग अत्यावश्यक आहे” डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

“महाराष्ट्रात २७ हजार करोना रुग्ण असून एक हजारपेक्षा जास्त मृत्यू आतापर्यंत झाले आहेत. राज्यात मृत्यूदर हा ३. ७ टक्के एवढा आहे तर गुजरात, तामिळनाडू आदी काही राज्यात नऊ हजारापेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण झाली आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ५३७ लोकांचा मृत्यू झाला असून तेथील मृत्यूदर हा ६.३ टक्के एवढा आहे. मुंबईत आगामी काळात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन संस्थात्मक क्वारंटाइन, पालिका रुग्णालयातील बेडची संख्या वाढवणे, अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढवताना खासगी रुग्णालयांचे सहकार्य जास्तीजास्त मिळवण्याचे काम वेगाने सुरु आहे” अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

आमचा भर करोनाचे मृत्यू राखण्यावर जास्त असून यासाठी खाजगी व पालिका रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्यातून कोमॉर्बिडिटीच्या रुग्णांवर वेळेत व प्रभावी उपचार देण्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञांच्या मदतीने उपचारात एकवाक्यता आणण्यात आली असून आगामी काळात रुग्ण संख्या वाढली तरी मृत्यूदर वाढणार नाही, यासाठी जास्त कळजी घेतली जाणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2020 10:20 am

Web Title: coronavirus mortality controlled despite increase in number of patients in mumbai scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुंबईहून चालत निघालेल्या चाकरमान्याचा वाटेतच मृत्यू
2 Coronavirus : मध्य मुंबईचे संकट गडद
3 झोपडपट्टय़ांमुळे पावसाळी समस्यांचा पेच
Just Now!
X