देशात करोनानं थैमान घातलं आहे. तर महाराष्ट्रातही करोनाचा विळखा घट्ट होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वेगात वाढत असून करोनानं कम्युनिटी ट्रान्समिशनद्वार पसरण्यास सुरूवात केली आहे. देशातील अनेक भागात करोना तिसऱ्या टप्प्यावर पोहोचला असून, यात मुंबईचाही समावेश आहे,” अशी माहिती दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोना पसरत असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे मुंबईकरांच्या आणि राज्य सरकारच्या चिंतेत आणखी एका संकटाची भर पडली आहे.

देशात गेल्या आठवडाभरात करोनाचा संसर्ग वेगानं फैलावला आहे. देशातील करोनाग्रस्तांची आकडेवारी चार हजारांच्या पुढे गेली असून, मृतांची संख्याही १०९ झाली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण असून, दिवसागणिक त्यामध्ये वाढ होत चालली आहे. राज्यात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असताना कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोनानं चंचुप्रवेश केला आहे.

देशातील सध्याच्या करोनाच्या स्थितीविषयी बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले,”देशातील अनेक भागांमध्ये करोना तिसऱ्या स्टेजमध्ये पोहोचला आहे. तर बहुतांश भाग दुसऱ्या टप्प्यातमध्येच आहे. काही भाग दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजच्या मध्ये आहे. काही ठिकाणी करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा अचानक वाढला आहे. विशेष म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशन होत असल्याचंही दिसून आलं आहे. मुंबई शहरात हे दिसलं आहे. देशातील करोनाची सद्यस्थिती दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. देशात कम्युनिटी ट्रान्समिशन झालेली ठिकाण आहेत. मात्र, कम्युनिटी ट्रान्समिशनमधून पसरणाऱ्या करोनाला पहिल्या टप्यातच रोखलं तर काळजी करण्यासारखी स्थिती निर्माण होणार नाही. त्यासाठी दक्ष राहणार आवश्यक झालं आहे,” असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं. ‘आज तक’च्या हवाल्यानं इंडिया टुडेनं हे वृत्त प्रकाशित केलं आहे.

“तबलिगी मरकजमध्ये जे सहभागी झाले आहेत. त्यांचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात जे आले, त्यांनाही शोधून काढण्याची गरज आहे. सहभागी झालेल्या आणि संपर्कात आलेल्या या दोन्ही प्रकारच्या लोकांना क्वारंटाइन करता येईल,”असं डॉ. गुलेरिया म्हणाले.