संदीप आचार्य, लोकसत्ता
महाराष्ट्रात करोनाने डोके वर काढायला सुरुवात केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा लॉकडाऊन हवा का, असा सवाल उपस्थित करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील कर्मचाऱ्यांमध्ये करोना लस घेण्याविषयीची उदासीनता चिंतीत करणारी आहे. सरकारने लस उपलब्ध करून दिल्यानंतरही राज्यात अवघ्या ४३. २९ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते.

महाराष्ट्रात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी व पोलिसांसह आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी म्हणून केंद्र व राज्य सरकारने व्यापक आघाडी उघडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक डॉक्टरांनी सुरुवातीला करोना लस घेतली असली तरी एकूण नोंदणी केलेले आरोग्य कर्मचारी व आघाडीच्या कर्मचाऱ्यांपैकी अवघ्या ४३.२९ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत १०,५४,८२२ आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ५,६४,१११ आरोग्य कर्मचाऱ्यांनी म्हणजे ५३.४८ टक्के लोकांनीच लस घेतली आहे. मुळातच फार कमी प्रमाणात आरोग्य कर्मचाऱ्यांनी या लसीकरणासाठी नोंद केली होती. त्यापैकीही केवळ निम्म्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले आहे. सांगली व औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे अनुक्रमे ४३.९ टक्के व ४३.१४ टक्के लसीकरण झाले तर भंडारा व पालघर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ७५.३१ टक्के व ७५. २४ टक्के लसीकरण झाले आहे.

आघाडीवरील आरोग्य कर्मचारी तर लसीकरणाबात खूपच उदासीन असून यात पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. करोनातील आघाडी कार्यकर्ते नोंदणीतही उदासीन होते. अवघ्या ५,९४,४७१ कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १,४९,९४४ कर्मचारी म्हणजे केवळ २५.२२ लोकांनी करोना लस घेतली. यात पुणे येथे सर्वात कमी अवघ्या ७.४२ टक्के लोकांनी लस घेतली. मुंबईत ११.०२ टक्के तर औरंगाबाद येथे ११.६५ टक्के आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी करोना लस घेणे पसंत केले.

गेल्या महिनाभरात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढताना दिसत असून मुख्यमंत्र्यांनी आता कठोर उपाययोजनांचे संकेत दिले आहेत. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या आठवड्यात २४१८ करोना रुग्णांची नोंद झाली तर ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी आणि १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान अनुक्रमे २६४६ व ३,५८१ करोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आज मंगळवारी १६ फेब्रुवारी रोजी ३६६३ करोना रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत एक कोटी ५३ लाख ९६ हजार ४४४ करोना चाचण्या करण्यात आल्या असून यात १३.४५ टक्के म्हणजे २० लाख ७१ हजार ३०६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील करोना आटोक्यात आणण्यासाठी सरकारने अनेक कठोर उपाययोजना केल्या होत्या. तथापि लग्न समारंभ, हॉटेल्स, बार, सार्वजनिक कार्यक्रमापासून लोकल रेल्वे सुरु केल्यानंतर पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले असून लोकांनी मास्कचा वापर करावा तसेच सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पोलीस व पालिकेने कठोर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या सर्वाचा ताण आरोग्य यंत्रणेवर पुन्हा पडण्याचा धोका असला तरीही आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर व कर्मचारी तसेच आघाडीवरील पोलिसांसारखे कर्मचारी लसीकरणासाठी उदासिनता का बाळगून आहेत हे एक कोडेच असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.