परिवहन आयुक्त कार्यालयाची घोषणा; करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई: करोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाकडूनही खबरदारीचे उपाय केले  जात आहेत. त्यासाठी शिकाऊ परवान्याचा कोटा (अनुज्ञप्ती) १० टक्क्य़ांनी कमी केला असून त्यामुळे ३१ मार्चपर्यंत अर्जदारांच्या तारखा पुढील महिन्यापर्यंत ढकलण्यात आल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शिकाऊ परवान्यासाठी संगणकीय चाचणीऐवजी तोंडी परीक्षा होणार असून एकावेळी फक्त एकाच नागरिकाची परीक्षा घेण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना दिले आहेत. यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये गोंधळ उडण्याचीही शक्यता आहे.

आरटीओ कार्यालयात विविध कामानिमित्त अनेक जण येत-जात असतात. त्यामुळे गर्दी  होते. परिवहन आयुक्त कार्यालयाने शिकाऊ परवाना प्रक्रियेत काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिकाऊ परवान्याकरिता ३१ मार्चपर्यंत १० टक्केपर्यंत कमी करण्याचे आदेश आरटीओंना दिले आहेत. शिकाऊ परवान्यासाठी ३१ मार्चपर्यंत घेतलेल्या तारखा पुढील महिन्यात देण्यात यावे.

३१ मार्चपूर्वी संपणार आहे, अशा अर्जदारांची पक्क्या परवान्याची चाचणी घेण्यात यावी, असे काढलेल्या आदेशात नमूद आहे. याशिवाय लायसन्सचे नूतनीकरण, वाहनांच्या पुनर्नोदणी, योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण आणि परवानासंबधित कामेच करण्याच्याही सूचना आहेत. नवीन नोंदणीची कामे सुरू राहणार आहेत. सर्व कॅम्प कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

पक्का परवाना, वाहन हस्तांतरण ३१ मार्चनंतरच

पक्का परवाना देण्याच्या कामातही बदल करण्यात आले आहेत. काही जणांना ३१ मार्चपर्यंत पक्के लायसन्सच्या देण्यात आलेल्या तारखा या पुढील महिन्यात देण्याचे आदेश आहेत. याशिवाय वाहन हस्तांतरण आणि कर्ज बोजा नोंद इत्यादी कामे पुढे ढकलण्यात आली आहेत.

करोना निदानासाठी रक्तचाचणी नाही

मुंबई : राज्यात करोना निदानासाठी संशयित रुग्णांची  तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही.  त्यामुळे करोना रक्ततपासणीच्या रूग्णालयांची समाजमाध्यमांवर फिरत असलेली यादी खोटी व चुकीची असून त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. करोना चाचणी व निदानासाठी महाराष्ट्रात सध्या तीन ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांचे नमुने पाठविले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय,  हाफकीन संस्था यांच्यासह  चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.  त्यामुळे समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेली करोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील रूग्णालयांची यादी खरी नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.