महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. मंत्रालयामध्ये दुपारी अडीचच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. मात्र या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्रालयामध्ये पोहचलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्क शिवाय दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुंबईमधील करोनाग्रस्तांची संख्या दहा हजारच्या वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर काही आठड्यांपूर्वीच घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटले होते. मात्र या नियमांचे आज राज यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बड्या नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास राज ठाकरे मंत्रालय परिसरामध्ये पोहचले. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र अमित ठाकरेही होते. अमित यांनी मास्क लावलेला असतानाच राज मात्र मास्क न लावता केवळ गॉगल घालून मंत्रालयामध्ये दाखल झाले. राज यांच्या पाठोपाठ लगेचच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीसही मंत्रालयामध्ये दाखल झाले. फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर होते. या दोघांनाही नियमांचे पालन करत मास्क घातल्याचे चित्र दिसले. मंत्रालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश करताना राज आणि फडणवीस यांची भेट घडली त्यांनी एकमेकांना नमस्कार केला आणि ते काहीतरी चर्चा करत होते. लिफ्टची वाट बघत दोघे बराच वेळ काहीतरी बोलत असल्याचे दिसून आले.

मुंबई महानगरपालिकेने मास्क घालणे बंधनकारक केलं असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला एक हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलं आहे. देशभरातील अनेक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. संसर्गजन्य करोनावर आळा घालण्यासाठी सार्जजनिक ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहे. असं असतानाही राज्यातील एका प्रमुख पक्षाच्या नेत्यानेच अशापद्धतीने नियमांचे उल्लंघन केल्याचे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज यांनी मास्क का घातलं नव्हतं याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

उद्धव यांनी बोलवलेल्या बैठकीसाठी राज ठाकरे, अमित ठाकरे, फडणवीस, दरेकर, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील यांच्यासारखे बडे नेते मंत्रालयामध्ये दाखल झाल्याचे वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरांनी टिपले. या बैठकीमध्ये राज्यातील लॉकडाउन, करोना रुग्णांची वाढती संख्या, उपाययोजना, अर्थव्यवस्थेसंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.