लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मुंबईमधील उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतुकही मागील अनेक आठवड्यांपासून बंद आहे. मात्र या लॉकडाउनमुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकाला ब्रेक लागल्याचा फायदा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने करुन घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकल ट्रेनच्या दोन्ही मार्गांवर डागडुजी, दुरुस्ती आणि देखभाल करण्यासंदर्भातील विशेष काम सुरु आहे.

जगातील सर्वात जास्त व्यस्त असणारा सार्वजनिक वाहतुकीची सेवा म्हणून मुंबई लोकलकडे पाहिले जाते. दिवसभरात जवळजवळ तीन हजार फेऱ्या मारणाऱ्या लोकल ट्रेनमधून ८० लाखांहून अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. मुंबईची लोकल ट्रेनही मुंबईची लाइफलाइन असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच अगदी १५ मिनिटं जरी रेल्वे सेवा कोलमडली तर गोंधळ उडतो आणि मुंबईकरांचे वेळापत्रक गडबडते. मात्र मागील काही आठवड्यांपासून लॉकडाउनमुळे मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे बंद आहे. याच कालावधीमध्ये आता रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही कामे हाती घेतली आहे. सामान्यपणे ही कामं रेल्वे प्रशासनाला रात्री काही तास रेल्वे सेवा बंद असते तेव्हा किंवा रविवारी मेगाब्लॉक घेऊन पूर्ण करावी लागतात. मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा ही खूप व्यस्त असते त्यामुळे अगदी मोजक्या तासांमध्ये आवश्यक असणारी कामचे करता येतात. त्यामुळेच काहीवेळा तांत्रिक अडचणी निर्माण होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले. मागील जवळवजळ महिनाभरापासून लोकल ट्रेनची वाहतूक बंद असल्याने रेल्वे प्रशासनाने सिग्नल सिस्टीम, ट्रॅक, ओव्हरहेड वायर्स आणि सामुग्री यासंदर्भातील कामे हाती घेतल्याचे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

“पश्चिम रेल्वेवर मोठा ब्लॉक घेणे शक्य नसते. त्यामुळेच आम्ही ही संधी रेल्वे ट्रॅक आणि इतर सुविधांची देखभाल करण्यासंदर्भातील कामे करुन घेण्यासाठी वापरत आहोत,” असं पश्चिम रेल्वेचे प्रमुख रविंद्र भाकर म्हणाले. लॉकडाउन सुरु झाल्यापासून रेल्वेचे कर्मचारी आणि कामगार रोज पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण एक हजार ३९४ किमी लांबीच्या ट्रॅकची पाहणी करतात. या ट्रॅकची एकूण लांबी २१० किमी असून त्यावर एक हजार २५० वेल्ड्स (रेल्वे रुळ एकमेकांना छेदतात तो पॉइण्ट) आहेत. या वेल्ड्सची अल्ट्रासॉनिक डिटेक्टर्सने तपासणी केली जाते. “सर्व ट्रॅक मशिनच्या सहाय्याने तपासण्यात आले आहेत. तसेच मार्गावरील ९९ किमी अंतरावर खडी पसरवण्यासंदर्भातील काम करण्यात आलं आहे. दोन हजार ५०३ किमी लांबीचे ट्रॅक्सची ‘ऑसिलेशन मॉनिटरिंग सिस्टीम’च्या (ओएमएस) माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे,” असं भाकर यांनी सांगितलं. याचबरोबर पश्चिम रेल्वेने ओव्हरहेड वायर आणि त्यासंबंधीत काम, सिग्नल, संवाद यंत्रणा यासंदर्भातील बरेच काम केले असल्याची माहिती भाकर यांनी दिली.

मध्य रेल्वेचे प्रमुख प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी दिलेल्य माहितीनुसार ट्रॅकची देखभाल करण्याबरोबरच मध्य रेल्वेने मार्गावरील जुने आणि गंजलेली निकामी झालेली ओव्हरहेड यंत्रे काढून टाकण्याचे महत्वाचे काम केले आहे. याचबरोबर सिग्नल्सची मॅगरींग (एक प्रकारची विघृत चाचणी), मुंबई क्षेत्रातील टेलिकॉम वायर्स बदलणे, ट्रान्सफॉर्मर्सची साफसफाई आणि डागडुजी करणे अशी कामे मध्य रेल्वेने केली आहेत. “आसनगाव आणि कसारा या मार्गावर ब्लॉक घेण्याची खूपच कमी संधी उपलब्ध होते. त्यामुळे लॉकडाउनच्या या कालावधीमध्ये या मार्गातील ओव्हरहेड प्रणालीशी संबंधित जुनी, गंजलेली, निकामी झालेली यंत्रे आणि ३४ ठिकाणी निरुपयोगी खांब काढून टाकण्यात आले आहेत. हे खांब ७० वर्षे जुने होते काही तर ब्रिटीश कालीन होते,” असं सुतार यांनी स्पष्ट केलं आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुनच हे काम केलं जात असल्याचेही सुतार यांनी सांगितलं. “रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने लॉकडाउनच्या कालावधीमध्ये प्रशासनाने कामे केली आहे. ही कामे करताना सर्व काळजी घेण्यात आली असून अगदी कार्यालये सॅनिटाइज करण्यापासून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यापर्यंतचे सर्व नियम काटेकोरपणे अंमलात आणत हे काम करण्यात आलं आहे,” असं सुतार म्हणाले.