मुंबईमध्ये करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. असं असतानाच या भितीच्या वातावरणामध्ये काही सकारात्मक बातम्या समोर येत आहे. अशीच एक बातमी सैफी रुग्णालयामधून समोर आली आहे. येथील एक महिला आणि तिच्या दोन मुलींना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. करोनावर मात करुन जवळजवळ दोन आठवड्यांनंतर या तिघी आपल्या घरी परतल्या. यापैकी सर्वात छोटी मुलगी अवघ्या दोन महिन्यांची असून तिची बहीण तीन वर्षांची असल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिलं आहे.

“करोनामुळे माझ्या काकांचा मृत्यू झाला. त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला करोनाचा चाचणी करुन घेण्यास सांगितले. मात्र एका चाचणीसाठी साडेचार हजार रुपये खर्च होता. घरातील सर्व सदस्यांची चाचणी करणे आम्हाला परवडणारे नव्हते,” अशी माहिती या महिलेच्या पतीने दिली. त्यामळे या कुटुंबाने राज्यातील माजी मंत्री जावेद श्रॉफ यांच्याशी संपर्क साधला आणि परिस्थितीची माहिती दीली. श्रॉफ यांनी मेट्रोपोलीस लॅबमध्ये फोन करुन या कुटुंबाची चाचणी करण्यास सांगितले आणि चाचणीचे खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. “माझी चाचणी निगेटीव्ह आली. मात्र माझे वडील, पत्नी आणि दोन्ही मुलांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना ९ एप्रिल रोजी सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं,” अशी माहिती या व्यक्तीने ‘मुंबई मिरर’शी बोलताना दिली.

एकीकडे कुटुंबाला रुग्णालयात दाखल करावे लागलेले असतानाच या व्यक्तीला क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं होतं. सेव्हन हिल्समधील करोना वॉर्डमध्ये आलेल्या अनुभवांबद्दल बोलताना ही महिला म्हणते, “आमच्यामध्ये लक्षणं दिसत नव्हती. मात्र त्या वॉर्डमधील अनेक वयस्कर रुग्ण सतत खोकत होते. माझी मुलं लहान असल्याने ती सतत तोंडावरील मास्क काढत असल्याने मला चिंता वाटत होती. या वॉर्डमधील प्रसाधनगृहेही स्वच्छ नव्हती.” रुग्णालयामध्ये खूप डास होते आणि आम्हाला वेळेवर जेवणही मिळत नव्हते, असंही या महिलेने सांगितलं.

“माझी पत्नी रुग्णालयामध्ये असताना मी घरीच क्वारंटाइन होतो. तिला फोन केल्यावर ती रडायची. त्यामुळे माझ्या चितेंत भर पडत असे. मानसिक शांतीसाठी मला डॉक्टरांनी काही औषधे सुचवली ज्याचा मला फायदा झाला. तसेच माझ्या शेजाऱ्यांनी या कठीण परिस्थितीमध्ये मला चांगली साथ दिली. ते रोज मला जेवण पाठवायचे. शेजारी रोज माझ्या दाराशी जेवण ठेवायचे,” असं या महिलेच्या पतीने सांगितले.

पत्नी आणि मुलांना होत असलेल्या त्रासाबद्दल या व्यक्तीने पुन्हा श्रॉफ यांची मदत घेतली. रुग्णालयातील परिस्थितीबद्दल त्यांनी माहिती दिली. दरम्यानच्या काळात सैफी रुग्णालयातील आठ बेड असणाऱ्या करोना वॉर्डमध्ये १३ अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात आली. श्रॉफ यांच्या ओळखीने सुत्र हलली आणि या तिघींनी सैफी रुग्णालयामध्ये हलवण्याची परवानगी मिळाली. मुलीना अधिक चांगले वैद्यकीय उपचार मिळण्याच्या दृष्टींने तिघींना सैफी रुग्णालयात हलवण्यात आलं.

सैफी रुग्णालयामध्ये आम्हाला चांगल्या सुविधा मिळाल्याचे या महिलेने सांगितले. “सैफीमधील कर्मचाऱ्यांनी मुलांची चांगली काळजी घेतली. आम्हाला वेळेत औषधे आणि जेवण मिळत होतं. तसेच रुग्णालयामधून दररोज आमच्यासंदर्भातील माहिती माझ्या पतीला फोन करुन सांगितली जायची,” असं या महिलेने सांगितलं. रोज मला मुलींबद्दल माहिती मिळत असल्याने माझी चिंता थोड्याफार प्रमाणात कमी झाल्याचे या व्यक्तीने सांगितले. दरम्यानच्या या व्यक्तीच्या वडिलांना आणि काकीच्या करोनाच चाचण्या निगेटीव्ह आल्यानंतर १६ एप्रिल रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

मंगळवारी या तिघींच्या चाचणीचे निकाल नगेटीव्ह आल्याने तिघींनाही डिस्चार्ज देण्यात आला होता. या तिघींना रुग्णवाहिकेमधून प्रवास करावा लागू नये म्हणून श्रॉफ यांनी खास सॅनिटाइज गाडीची व्यवस्था केली होती. हे संपूर्ण कुटुंब घरी सुखरुप परतल्याबद्ल श्रॉफ यांनी समाधान व्यक्त केलं आहे. “मला या दोन महिन्याच्या मुलीला मदत करण्याची संधी मिळाली यासाठी मी देवाचा आभारी आहे,” असं मत श्रॉफ यांनी व्यक्त केलं.