हिट अॅंड रन प्रकरणात अभिनेता सलमान खान याला सत्र न्यायालयाने सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा योग्यच असल्याचा दावा सरकारी वकील संदीप शिंदे यांनी उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवेळी केला. सलमान खानवर लावण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध झाले असून, त्याला कोणतीही दया दाखवण्यात येऊ नये, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर सध्या न्यायमूर्ती ए. आर जोशी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ज्या वेळी हा अपघात झाला, त्यावेळी सलमान खानने मद्यप्राशन केले होते. दुसऱ्या दिवशी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले त्यावेळीही त्याच्या तोंडाला मद्याचा वास येत होता, असे संदीप शिंदे यांनी न्यायालयात सांगितले. त्याचबरोबर सलमान खानच्या वकिलांनी केलेले युक्तिवादही त्यांनी फेटाळले. सलमान खानचा वाहनचालक अशोक सिंग घटना घडली त्यावेळी गाडी चालवत होता, हा बचाव पक्षाचा युक्तिवाद त्यांनी फेटाळला. अशोक सिंग नव्हे, तर सलमान खानच अपघातावेळी गाडी चालवत होता, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. त्याचबरोबर गाडीचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवादही फेटाळण्यात आला. अपघातानंतर गाडी बेकरीच्या पायरीवर चढल्यानंतर तिचा टायर फुटला होता. अपघाताआधी टायर फुटलेला नव्हता, असेही न्यायालयात सांगण्यात आले.