* आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांसाठी तिप्पट दराने नाइट ड्रेसची खरेदी
* सहा कोटींच्या नाइट ड्रेससाठी १८ कोटींचा खर्च
मुंबई-पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी बाजारात तीनशे ते चारशे रुपयांमध्ये नाइट ड्रेस उपलब्ध असताना आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधील सुमारे सव्वा लाख मुला-मुलींसाठी घाऊक प्रमाणात सुमारे साडेचारशे ते सहाशे रुपये दराने नाइट ड्रेस खरेदी करण्याचा ‘पराक्रम’ आदिवासीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या विभागाने केला आहे.
राज्यात आदिवासी विभागाअंतर्गत ५२५ आश्रमशाळा असून यातील पहिली ते बारावीच्या सुमारे सव्वा लाख मुला-मुलींसाठी टॉप आणि पायजमा खरेदी करण्याचा निर्णय घेऊन मे २०१२ मध्ये निविदा काढण्यात आल्या आणि जूनमध्ये निविदांची छाननी होऊन २७ जुलै रोजी आदिवासी विकास आयुक्तांनी १८ कोटी ४६ लाख रुपयांचे नाइट ड्रेस खरेदी करण्याचे आदेश दिले. मुंबईच्या ‘एनकोर फूड्स अ‍ॅण्ड अ‍ॅलाइड सव्‍‌र्हिसेस’ या कंपनीला सदर काम देण्यात आले आहे. आदिवासी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार अपेक्षित दराच्या तीनशे टक्के जास्त दराने ही खरेदी झाली आहे. आदिवासी विभागाने जाहीर केलेल्या निविदेमध्ये नाइट ड्रेससाठी अपेक्षित खर्च सहा कोटी नऊ लाख रुपये दाखविण्यात आला आहे. हा अंदाजित खर्च मागील वर्षीच्या खरेदी दराचा आढावा घेऊन तसेच बाजारातील उपलब्ध दराचा विचार करून काढला जातो. या दरापेक्षा जास्त दराने कंपन्यांनी निविदा भरल्यास फेरनिविदा मागविण्याची तरतूद आहे. मात्र आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम नाइट ड्रेस मिळावा या ‘उदात्त’ हेतूने तब्बल तीनशे टक्के जास्त दराने म्हणजे १८ कोटी ४६ लाख रुपये दराने खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले.
बाजारात एक ड्रेस तीनशे ते चारशे रुपयांना उपलब्ध असताना सव्वा लाख ड्रेसची खरेदी त्यापेक्षा स्वस्तात होणे अपेक्षित होते. या खरेदीत पहिली ते चौथीच्या मुला-मुलींसाठी २४३ रुपये प्रति टॉप, तर १९९ रुपयांना पायजम्याची खरेदी करण्यात आली, तर दहावी ते बारावीच्या मुला-मुलींसाठी ३२५ रुपयांना टॉप आणि २६६ रुपयांना पायजमा खरेदी करण्यात आला आहे. बाजारभावापेक्षा तसेच स्वत:च अंजादित केलेल्या खर्चापेक्षा तीनशे टक्के जास्त दर आल्यानंतर फेरनिविदा का काढण्यात आली नाही, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.