‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून एका दाम्पत्याची सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला वरळी पोलिसांनी कोलकाता येथून अटक केली. या प्रकारे फसवणूक करणारी टोळी पाकिस्तान देशातील मोबाइल क्रमाकांवरून आपले सावज हेरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. संपूर्ण देशभरात या टोळीने या प्रकारे शेकडो जणांची आíथक फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अर्शद सय्यद अली (२०), जाफर अब्बास हसमुल्ला शेख (२२) आणि इरफान अली मियाँ अन्सारी (३२) असे अटक करण्यात आलेल्या त्रिकुटांची नावे आहेत. मुळचे बिहार राज्यातील गोपाळगंज जिल्हय़ात राहणाऱ्या त्रिकुटाला कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे. १५ मे रोजी वरळीत राहणाऱ्या एका दाम्पत्यापकी पत्नीला पाकिस्तान देशातील मोबाइल क्रमाकांवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला वोडाफोन कंपनीतून राजवीर बोलत असल्याचे सांगून तुम्हाला ‘कौन बनेगा करोडपती’ मधून २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगितले. लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी विविध बँकेच्या खात्यात काही रक्कम भरावी लागेल, असे सांगण्यात आले.
त्यानुसार दाम्पत्याने प्रत्येकी १५, १० आणि १५ हजार रुपयांची रक्कम विविध बँकाच्या खात्यात भरली. त्यानंतर राजवीर नावाच्या व्यक्तीने फोन करून आणखी रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितली. या दाम्पत्याने एकूण ३ लाख ३० हजार रुपयांची रक्कम विविध बँकेच्या खात्यात भरले होते. त्यानंतर १८ मे रोजी पुन्हा या दाम्पत्याच्या मोबाइलवर संपर्क साधून राजवीर याने आणखी साडेतीन लाख रुपये भरण्याची त्यांना सूचना केली. न भरल्यास आधीची लॉटरी मिळणार नाही, असेही त्याने त्यांना सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली. वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता तक्रारदारांना आलेले मोबाइल क्रमांक पाकिस्तानचे असल्याचे उघड झाले. या गुन्हय़ाच्या तपासासाठी वपोनि. विनय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल रोकडे, अमोल माळी आणि पथक यांनी तपास सुरू केला.
तपास पथकाने प्रथम बँकेत ज्या खात्यावर रक्कम भरण्यात आली त्या खात्याची माहिती मिळवली असता हे सर्व खातेदार आसाम राज्यातील असल्याचे उघडकीस आले. ही रक्कम कोलकाता येथील विविध एटीएम सेंटरमधून काढण्यात आल्याचे समजले. पोलिसांनी संबंधित एटीएम सेंटरचे सीसीटिव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक कोलकाता येथे रवाना झाले. दरम्यान, एका खात्यातून तेथील एटीएम सेंटरमधून मोठी रक्कम काढणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हय़ाची कबुली दिली. तसेच त्याचे इतर दोन साथीदारांपकी एकाला कोलकाता आणि दुसऱ्याला बिहार राज्यातील गोपाळगंज जिल्हय़ातून अटक करण्यात आली. या त्रिकुटाजवळून पोलिसांनी २००पेक्षा अधिक विविध बँकांचे डेबिट कार्ड हस्तगत केले आहे.तसेच सुमारे ४२ पेक्षा अधिक पाकिस्तानी मोबाइल क्रमांक मिळून आले आहेत.