राज्यात करोना संकटाचा सामना करण्यासाठी एकीकडे राज्य सरकार आणि आरोग्य विभाग दिवसरात्र मेहनत करत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांना वारंवार करोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यासाठी आवाहन करत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लसीकरण आणि मास्क या दोन गोष्टी महत्वाच्या असल्याचं सांगत आवाहन आणि जनजागृती केली जात आहे. मात्र अद्यापही अनेकांकडून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर टाळला जात असून या अशा बेफिकीर नागरिकांवर मुंबई पालिकेने कारवाई करत तब्बल ५८ कोटींचा दंड वसूल केला आहे.

२३ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबई पोलीस तसंच रेल्वेकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण ५८ कोटी ४२ लाख ९९ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

मुखपट्टीविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करत मुंबई पोलिसांनी ७ कोटी ६२ लाख ७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर रेल्वेने एकूण ५० लाख ३९ हजार २०० इतका दंड वसूल केला आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे (२२ लाख ६३ हजार ४००), हार्बर रेल्वे (६ लाख ५७ हजार ६००) आणि मध्य रेल्वे (२१ लाख १८ हजार २००) अशा तिन्ही मार्गांचा समावेश आहे.

मास्कविना फिरणाऱ्यांमुळे अन्य नागरिकांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरताना मुखपट्टीचा वापर करावा, असं आवाहन पालिकेकडून पुन्हा करण्यात आलं आहे.

दरम्यान मुंबईत गुरुवारी ७८९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी ३५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. बाधितांचे प्रमाण मात्र २.२१ टक्के इतकेच होते. गुरुवारी ७८९नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या सात लाख २४ हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात ५४२ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत सहा लाख ९१ हजारांहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या १४ हजार ८१० झाली आहे.