मुंबई : ब्रिटन, युरोप आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले असून त्यांची करोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र पालिका आयुक्तांनी रविवारी परिपत्रक काढून याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.

करोनाच्या संकरावस्थेमुळे ब्रिटनमध्ये संसर्ग प्रसार वाढल्याने ब्रिटन, युरोप आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. २२ डिसेंबरपासून ब्रिटन आणि भारतादरम्यानची विमानसेवा बंद केलेली असली तरी युरोप आणि आखातातून येणाऱ्या प्रवाशांना हे नियम लागू आहेत. या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठी पालिकेने हॉटेलमधील दोन हजार खोल्या आरक्षित केल्या आहेत. प्रवाशांना त्यांच्या खर्चाने या ठिकाणी राहावे लागणार आहे.

विमानतळावर आल्यापासून सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या परिपत्रकात पाचव्या किंवा सातव्या दिवशी चाचण्या करण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आता या चाचण्या सातव्या दिवशीच कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, परराष्ट्रांच्या दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट दिली जाणार आहे. मात्र त्यांना तसा अर्ज करावा लागणार आहे.

युरोपातून आलेला प्रवासी बाधित आढळल्यास त्याला सेव्हन हिल्स रुग्णालयात आणि अन्य देशांतून आलेल्या बाधित प्रवाशांना ‘जीटी’ रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.

१४ दिवस विलगीकरण..

सातव्या दिवशी करोना चाचणी केल्यानंतर प्रवाशाला करोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाल्यास संस्थात्मक विलगीकरणातून सोडण्यात येईल. मात्र त्यांना पुढील सात दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. १४ दिवसांचा विलगीकरणाचा नियम प्रवाशांनी पाळणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हातावर तसा शिक्का मारण्यात येणार आहे. तसेच घरीच विलगीकरणात राहू, असे हमीपत्र प्रवाशांकडून घेतले जाणार आहे.