चेंबूर-टिळकनगर स्थानकांदरम्यान रुळाला तडे गेले आहेत, त्यामुळे हार्बर मार्गावरची वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. आज सकाळीच रुळ दुरुस्त करण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना ऑफिसच्या वेळेतच त्रास सहन करावा लागतो आहे. एकीकडे कसारा ते इगतपुरी दरम्यान पावसामुळे रुळावर माती साठलेली असल्याने तिथली वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे हार्बर मार्गावर रुळाला तडे गेले आहेत.
पावसाळा आला की मध्य आणि हार्बर रेल्वेची बोंब होणं या दरवर्षीच्याच गोष्टी झाल्या आहेत. २ जुलै रोजी मुंबईत जो काही पाऊस झाला त्यामुळे मध्य रेल्वे १६ तास बंद होती. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही परिणाम झाला होता. आता आज पुन्हा एकदा हार्बर रेल्वे मार्गावर रुळाला तडे गेले आहेत ज्यामुळे हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक उशिराने सुरु आहे. याआधी जानेवारी महिन्यातही या मार्गावर रुळाला तडे जाण्याची घटना घडली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2019 10:58 am