अधिकारांच्या गैरवापराचा ‘सीबीआय’चा आरोप

मुंबई : राज्याच्या गृह खात्याने १०० कोटी रुपये हप्तावसुलीचे लक्ष्य निश्चित केल्याच्या कथित आरोपप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी गुन्हा नोंदवला. कर्तव्यात कुचराई, अधिकारांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न, असे आरोप ‘सीबीआय’ने त्यांच्यावर ठेवले आहेत.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांनुसार देशमुख आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती सीबीआय प्रवक्त्याने दिली. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, अ‍ॅड्. जयश्री पाटील यांच्या याचिकांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’ला प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीतून पुढे आलेल्या तपशिलांच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट के ले. ‘सीबीआय’च्या विशेष पथकाने दिल्ली मुख्यालयाला लिहिलेल्या पत्राची प्रत प्रथम माहिती अहवालाला (एफआयआर) जोडण्यात आली आहे.

गुन्हा नोंदवल्यानंतर ‘सीबीआय’च्या विविध पथकांनी शनिवारी सकाळी देशमुख यांचे नागपूर येथील निवासस्थान, मुंबई येथील ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय आणि वरळीतील ‘सुखदा’ इमारतीतील निवासस्थानांवर छापे घालून पुरावे आणि संबंधित कागदपत्रांसाठी शोध कारवाई राबवली.

अजित पवारांची सावध भूमिका

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था (सीबीआय) तपास करत आहे. पुण्यात असल्याने अद्याप देशमुख यांच्याशी संपर्क झालेला नाही. चौकशीला महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. केंद्रीय संस्थांनी निष्पक्ष भूमिके तून चौकशी करावी, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली.