तबलिगी जमातने दिल्ली येथे आयोजित के लेल्या धार्मिक संमेलनात सहभागी होऊन परतलेल्या सुमारे दीडशे व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

या सगळ्यांविरोधात करोना साथरोगाचा प्रादुर्भाव पसरवण्यास कारणीभूत ठरणे, स्वत:सोबत इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणे, असा आरोप ठेवण्यात आला आहे. असे असले तरी यापैकी प्रत्येकाला शोधणे, त्यांची वैद्यकीय चाचणी करवून घेणे ही प्राथमिकता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

बुधवारी वांद्रय़ाच्या बेहराम पाडय़ातील २२ वर्षीय तरुण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. हा तरुण मरकजहून परतला होता. निर्मलनगर पोलिसांनी वेळेत या तरुणापर्यंत पोहोचून त्याची वैद्यकीय चाचणी करून घेतली.

तबलिगी जमातने दिल्लीत धार्मिक संमेलन आयोजित के ले होते. या संमेलनात करोनाबाधित परदेशी व्यक्तींचा समावेश होता. भारताच्या प्रत्येक राज्यातून मोठय़ा संख्येने या संमेलनाला मुस्लीम धर्मीय उपस्थित होते. हे संमेलन सुरू असतानाच करोना साथ रोग जाहीर करण्यात आला आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य आणि जिल्हय़ांतर्गत प्रवासासह अन्य निर्बंध लादण्यात आले. करोनाबाधित व्यक्ती किं वा करानोची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वत:हून पुढे यावे, चाचणी करून घ्यावी, आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आदेश जारी के ले गेले. करोनाचा प्रादुर्भाव वाढेल किं वा स्वत:सह इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशी कोणतीही कृती करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला जाईल, असे आदेश जारी केले गेले. याच आदेशांचा वापर करून मुंबई महापालिके ने के लेल्या तक्रोरीवरून २ एप्रिलला आझाद मैदान पोलिसांनी दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकजहून परतलेल्या सुमारे दीडशे व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला.

मरकजहून परतलेल्या व्यक्तींनी करोनाचा प्रसार के ल्याचे लक्षात येताच केंद्रीय यंत्रणांनी युद्धपातळीवर हालचाली के ल्या. मरकज आणि परिघात वावरलेल्या व्यक्तींचे भ्रमणध्वनी केंद्रीय यंत्रणांनी मिळवले आणि ते राज्याराज्यांना वितरित के ले. मुंबई पोलिसांना सुमारे दीडशे व्यक्तींचे भ्रमणध्वनी क्रमांक आणि माहिती असलेली यादी उपलब्ध करून देण्यात आली. ती यादी आणि पोलीस ठाण्यांच्या पातळीवर तबलिगी जमातशी संबंधितांनी दिलेल्या तपशिलांआधारे मुंबई पोलिसांनी दिल्लीहून परतलेल्या बहुसंख्य व्यक्तींना शोधले. यातील काही व्यक्ती परप्रांतीय मजूर असून त्या मरकजहून थेट मुंबईला परतण्याऐवजी आपापल्या गावी गेल्याचे स्पष्ट झाले. अशा व्यक्तींची माहिती मुंबई पोलिसांकरवी त्या त्या राज्यांना कळविण्यात आली.

पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २४ व्यक्ती मरकज किंवा दिल्लीहून परतल्या होत्या. त्या सर्वाशी पोलिसांनी संपर्क साधला. त्या सर्वानी पोलिसांच्या सूचना पाळून आपापली वैद्यकीय चाचणी करून घेतली. सध्या या सर्वाना दोन आठवडय़ांसाठी घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आाहेत. त्या सर्व पोलिसांच्या निगराणीखाली आहेत.