समीर कर्णुक

गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा वाढता वावर; नागरिकांची गैरसोय

अनेक वर्षे रखडल्यानंतर कुल्र्यातील पूर्व-पश्चिमेला जोडणारा भुयारी मार्ग वर्षभरापूर्वी पादचाऱ्यांसाठी खुला झाला असला तरी देखभालीअभावी या भुयारी मार्गाची दुरवस्था झाली असून, या ठिकाणी गर्दुल्ले व भिकाऱ्यांनी बस्तान बसविल्याने सामान्यांकरिता तो असुरक्षित बनला आहे.

कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या भुयारी मार्गाचे भूमिपूजन २००३ साली शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केले होते. रेल्वेच्या मार्गाखालून हा भुयारी मार्ग जात असल्याने खोदकाम करताना अनेक अडचणी याठिकाणी येत होत्या. त्यामुळे अनेक वर्षे या भुयारी मार्गाचे काम बंदच होते. मात्र गेल्या काही वर्षांत कुर्ला स्थानकावरील गर्दीमध्ये मोठी वाढ झाल्याने याठिकाणी हे थांबलेले काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी पादचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. त्यानुसार पालिका आणि रेल्वेने एकत्र येत या भुयारी मार्गाचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण केले. त्यानंतर २६ ऑक्टोबर, २०१७ ला युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या हस्ते या भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.

मात्र उद्घाटनानंतर काही दिवसांतच या भुयारी मार्गात सांडपाणी मोठय़ा प्रमाणात साचून राहिले होते. त्यानंतर पावसाळ्यात भुयारी मार्गाच्या भितींचा रंग उडू लागला. छताची रंगरंगोटीही ढासळू लागली. त्यानंतर पालिकेने तात्पुरती डागडुजी करत या भुयारी मार्गात सीसी टीव्हीदेखील बसविले. मात्र या भुयारी मार्गात देखभालीसाठी एकही सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांनी वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.

दिवसरात्र नशा करून हे गर्दुल्ले येथे ठाण मांडून असतात. पालिकेने या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी पादचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. कुल्र्यातील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या भुयारी मार्गावर गर्दुल्ले व भिकाऱ्यांनी बस्तान बसविले आहे.