राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात धर्मनिरपेक्षता याबद्दल केलेल्या टिप्पणीवर हा

संकेत असल्याची प्रतिक्रिया बुद्धिवंतांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भाजपकडून मात्र राज्यपालांच्या भूमिके चे समर्थन करण्यात आले व ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी, राज्यपालांच्या टिप्पणीवर संके तभंग व राजकीय आगाऊपणा असल्याची कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, कोणतेही संकेत पाळायचे नाहीत. कोणत्याही पदाची प्रतिष्ठा ठेवायची नाही, अशा पद्धतीने सगळे चालले आहे. राज्यपालांकडे लोक तक्रार करतात. त्यावर रीतसर टिप्पणी लिहून ती सरकारकडे पाठविणे अशी पद्धत असते. पण त्यांनी हा सगळा जो दीडशहाणपणा के ला आहे, त्याला संकेतभंग आणि राजकीय आगाऊपणा याखेरीज दुसरे काही शब्द नाहीत. राज्यपालांनी ज्या टिप्पण्या केलेल्या आहेत त्या सगळ्या राजकीय आहेत. ते राज्यपालांनी करणे अपेक्षितच नाही. ते राज्यप्रमुख आहेत. त्यांनी फक्त सरकारला सांगायचे की लोकांनी अशी मागणी केली. तुम्ही याचा विचार करा. मात्र त्यांचे आतापर्यंतचे वर्तन, त्यांच्या वेळोवेळीच्या टिप्पण्या राज्यपालपदाला न शोभणाऱ्या आहेत. राज्यपालपद हे सांविधानिक पद आहे, त्याचा संयम बाळगूनच त्यांनी वागायला हवे. संयम झेपत नसेल तर पद सोडावे आणि उत्तराखंडमधून राजकारण करावे.

राज्यशास्त्राचे प्राध्यापक व राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी राज्यपाल हे देवेंद्र फडणवीस यांची राजकीय भूमिका पार पाडत आहेत, असे म्हटले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे बदललेले आहेत हेही राज्यपाल लोकांच्या नजरेस आणून देताहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. विशेषत: करोना साथरोगाच्या काळात गेल्या सहा-सात महिन्यांत उद्धव ठाकरे बदलले आहेत ही वस्तुस्थिती आहे. मस्लिमांबद्दल ते बरेच उदारमतवादी झाले असल्याचे दिसते आहे. ते जरा आता विवेकी विचार करताहेत. भाजपचे राजकारण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस करत होते, परंतु ते बिहारला गेल्यामुळे जणू काही त्यांचीच भूमिका राज्यपाल पार पाडत आहेत, असे चित्र तयार झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘लोकभावना व्यक्त केल्या’

भाजपचे  खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही राज्यपालांच्या भूमिके चे समर्थन केले. राज्यपालांच्या म्हणण्याचा मथितार्थ व्यापक लोकभावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा होता. तो लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी जशी भूमिका घेतली असती तशीच भूमिका घेण्याची उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपालांनी स्वाभाविकपणे अपेक्षा व्यक्त केली.

घटनाविरोधी भूमिका

पुरोगामी चळवळीतील अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी राज्यपालांची ही भूमिका घटनाविरोधी आहे असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात की काय असे राज्यपालांनी म्हणणे हे चुकीचे आहे. राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. घटना निधर्मी किंवा धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे राज्याच्या प्रमुखांनी अशा प्रकारचे विधान करणे घटनाविरोधीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

धर्मनिरपेक्ष मूल्याचा अनादर : अ‍ॅड. अणे

तुम्ही धर्मनिरपेक्ष बनलात का, असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणे आश्चर्यकारक आहे. राज्यपालांच्या पत्रातील भाषेचा सूर धर्मनिरपेक्ष मूल्याचा अनादर करणारा आहे, असे मत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचे म्हटले आहे. धर्मनिरपेक्षता हे भारताचे वैशिष्ट आहे. राज्यपाल या नात्याने देशाचे धर्मनिरपेक्षतेचे मूल्य स्वीकारले पाहिजे, असे अणे म्हणाले.