दीड वर्ष उलटूनही राज्य शासनाकडून दुर्लक्ष

मुंबई: नव्या रेल्वेमार्गासाठी पुरेशी जागा नसल्याने मध्य रेल्वे उपनगरीय वाहतुकीसाठी भुयारी मार्गाचा पर्याय पुढे आला होता. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते ठाणे भुयारी जलद मार्गाचा प्रस्ताव दीड वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे सादर के ला. अद्यापही राज्य सरकारकडून एमआरव्हीसीला प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, हा प्रस्ताव बासनातच गुंडाळण्याची शक्यता असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

काही वर्षांपूर्वी प्रभादेवी स्थानकात (तत्कालीन एल्फिन्स्टन) झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कोकण रेल्वेचे जनक आणि मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांनी मुंबई उपनगरी रेल्वेच्या क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. उपनगरी रेल्वे गाडय़ांची प्रवासी वहनक्षमता संपली असून, नवीन मार्ग म्हणून भुयारी रेल्वेमार्गाचा पर्याय निवडावा, असे त्यांनी रेल्वे मंत्रालयाला सुचवले होते. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने याबाबत एमआरव्हीसीला विचारणा के ली. त्यानुसार एमआरव्हीसीने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मदतीने मध्य रेल्वेवरील प्रस्तावित भुयारी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण के ले. या सर्वेक्षणानंतर सीएसएमटी ते ठाण्यापर्यंत भुयारी रेल्वेमार्ग शक्य असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत एमआरव्हीसीने साधारण दीड वर्षांपूर्वी प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर तो रेल्वे मंत्रालय, निती आयोग, केंद्रीय मंत्रिमंडळाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार होता, परंतु त्याचा विचारच झालेला नाही.

भुयारी मार्ग प्रकल्पाबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे या मार्गाचा विचार पुढे होऊ शकलेला नाही. सरकारच्या प्रतिसादाचीच प्रतीक्षा आहे, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराना यांनी सांगितले.

प्रवास वेळ वाचणार

प्रस्तावानुसार, सीएसएमटी ते ठाणे हा ३३ किलोमीटरचा भुयारी रेल्वेमार्ग पूर्णत: जलद असेल. सध्या सीएसएमटीहून ठाण्यापर्यंत जलद मार्गावर प्रवासासाठी जवळपास ४० मिनिटे लागतात. भुयारी मार्गामुळे हा प्रवासवेळ २१ मिनिटांवर येईल. सीएसएमटी, दादर (मध्य रेल्वे), कु र्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे ही स्थानके  भुयारी रेल्वेमार्गावर असतील.