News Flash

सीएसटीचा प्लॅटफॉर्म क्र. १ बंद होणार?

हार्बर मार्गावरील वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वेच्या अर्थसंकल्पात येत्या काळात हार्बर मार्गावरही १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्याची घोषणा करण्यात आली.

| March 27, 2014 05:39 am

हार्बर मार्गावरील वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वेच्या अर्थसंकल्पात येत्या काळात हार्बर मार्गावरही १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्याची घोषणा करण्यात आली. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्याच्या तयारीत असलेल्या मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणासमोर हार्बर मार्गावरील स्थानकांच्या विस्तारीकरणाचा प्रश्न आहे. इतर स्थानकांमध्ये हा प्रश्न सुटणे शक्य होणार असले, तरी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकबाबत गंभीर समस्या उद्भवली आहे. या प्लॅटफॉर्मच्या टोकाला रेल्वेचीच इमारत असल्याने भविष्यात हा प्लॅटफॉर्म बंद करून सर्व वाहतूक प्लॅटफॉर्म दोनवरून चालवण्याचा विचार सध्या सुरू आहे.
हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवणे सोपे असले, तरी या मार्गावरील स्थानकांवर त्या थांबवणे कठीण आहे. या मार्गावर मानखुर्दपर्यंतच्या स्थानकांचे प्लॅटफॉर्म नऊ डब्यांच्या गाडय़ांसाठी बनलेले आहेत. यांपैकी काही स्थानके पुलावर असल्याने त्यांच्या विस्तारीकरणालाही मर्यादा आहेत. पण या स्थानकांपेक्षाही छत्रपती शिवाजी टर्मिनसवर प्लॅटफॉर्म क्रमांक एकचा विस्तार करणे जास्त अवघड आहे. या प्लॅटफॉर्मवर कल्याणच्या दिशेला रेल्वेचीच इमारत आहे. ही इमारत या प्लॅटफॉर्मला लागून असल्याने बारा डब्यांसाठी हा प्लॅटफॉर्म वाढवणे शक्य होत नाही.
त्यामुळे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने आता या प्लॅटफॉर्मवरून सेवा बंद करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. हार्बर मार्गावरील सर्व वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरूनच करण्यात यावी, असे एमआरव्हीसीने म्हटले आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या रुळांवर येणाऱ्या गाडीतून लोकांना प्लॅटफॉर्म दोनवरच उतरावे लागेल. पण हार्बर मार्गावर बारा डब्यांच्या गाडय़ा सुरू होणे सहज शक्य होईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू असला, तरी अंतिम निर्णय झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ही योजना मान्य झाल्यास भविष्यात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलतील. सध्या १८ प्लॅटफॉर्म असलेल्या या टर्मिनसवरील एक प्लॅटफॉर्म कमी होईल. उपनगरीय सेवेसाठी सातऐवजी सहाच प्लॅटफॉर्म उपलब्ध राहतील आणि सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन हा प्लॅटफॉर्म क्रमांक एक बनेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 5:39 am

Web Title: cst platform no 1 to be closed
Next Stories
1 तरुणीवर बलात्कार करणाऱ्यास सात वर्षांची सक्तमजुरी
2 आयपीएस अधिकाऱ्याला सरकारकडून निर्दोषत्व
3 बिना अधिकार फुल्ल पगार!
Just Now!
X