अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळ गुरुवारी गुजरातमध्ये धडकणार असून बुधवारी या वादळाचा परिणाम मुंबईतही जाणवला. मुंबई आणि उपनगरात पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच झाडांखाली कार पार्क करु नये तसेच उभे राहू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘वायू’ चक्रीवादळात त्याचे रूपांतर झाले असून हे वादळ गुरुवारी गुजरात सीमेवर थडकणार आहे. हे वादळ उत्तरेकडे सरकत जाऊन पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातचा किनारा ओलांडून वेरावळ आणि दिव येथे धडकेल, तेथे वादळाचा वेग ताशी १३५ कि.मी राहील.  कच्छपासून दक्षिण गुजरातपर्यंत सर्व किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.  या वादळामुळे मुंबईला धोका नसला तरी बुधवारी या वादळाचा परिणाम मुंबईतही जाणवला.

मुंबईत वाऱ्यांचा वेग वाढला असून वादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस पडत आहे. या पार्श्भूमीवर मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे आवाहन केले आहे. वसई, विरार, भिवंडी या भागातही रिमझिम पावसाने हजेरी लावली.

पश्चिम रेल्वेनेही या वादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बैठक घेतली. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवली जाणार आहे. किनारपट्टीलगतच्या भागांमधील रेल्वेच्या विभागीय मंडळांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. गांधीधाम, भावनगर पारा, पोरबंदर, वेरावल, ओखा या भागांसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या वादळाचा फटका बसणाऱ्या भागांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी ही विशेष गाडी सोडली जाणार आहे.