केरळमध्ये मान्सून धडकला असला तरीही मुंबईकरांना पावसाची आणखी सात दिवस वाट पहावी लागणार आहे. IMD अर्थात भारतीय हवामान खात्याने या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. गुरुवारी मुंबईला चक्रीवादळाचा धोका असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हा धोका टळला आहे. असं असलं तरीही पाऊस पडण्यासाठी मुंबईकरांना एक दोन नाही तब्बल सात दिवस वाट पहावी लागणार आहे. वायू चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. मुंबईला या वादळाचा काही प्रमाणात धोका होता जो टळला आहे. मात्र मान्सून या वादळामुळे लांबणीवर पडला आहे.

आठवड्याभरापूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्याची प्रतीक्षा राज्याला लागून राहिली असतानाच ही बातमी समोर आली आहे. १३ आणि १४ जूनला मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र वायूचा फटका मान्सूनला बसला आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळाचं चित्र आहे. तसंच उकाड्यानेही नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा पावसाकडे लागलेल्या असताना हवामान खात्याने पाऊस पडण्यास सात दिवसांचा अवधी आणखी लागेल असा अंदाज वर्तवला आहे.