पहाटे सुटणाऱ्या बसला कमी प्रवासी मिळण्याची शक्यता
आर्थिक प्रगतीच्या नावाने बोंब असणाऱ्या एस.टी. महामंडळाने नव्याने सुरू केलेली दादर-औरंगाबाद ही वातानुकूलित शिवनेरी सेवा कच्च्या नियोजनामुळे अपयशी ठरण्याची शक्यता आहे.
१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या बसची वेळ पहाटेची, म्हणजेच प्रवाशांसाठी अडनिडी असल्याने प्रवासी या बसला कसा प्रतिसाद देतील, असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याऐवजी एस.टी.ने रात्रीच्या वेळी या बसगाडय़ा सोडल्यास त्यांना जास्त प्रवाशांची पसंती मिळाली असती, असाही सूर ऐकू येत आहे.
मात्र नवीन सेवा सुरू करताना त्या मार्गावरील इतर सेवा पुरवठादार नेमके काय करतात, याचा अभ्यास न करण्याची चूक करून एस.टी.ने आपले ‘पहिले पाढे पंचावन्न’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
एस.टी.ची प्रतिमा बदलण्यासाठी एस.टी. महामंडळाने शिवनेरी सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली होती. राज्यातील विविध शहरांना शिवनेरी सेवेद्वारे जोडून प्रवाशांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न एस.टी. महामंडळ करीत आहे. त्यानुसार एस.टी.ने दादर-औरंगाबाद या मार्गावर १ नोव्हेंबरपासून शिवनेरी सेवा सुरू केली.
पहाटे ५.३० आणि ६.३० वाजता सुटणाऱ्या या दोन सेवा दुपारी अनुक्रमे १.३० आणि २.३० वाजेपर्यंत औरंगाबाद येथे पोहोचतील, असे नियोजन एस.टी.ने केले आहे. तसेच या सेवांमुळे एकाच वेळी अहमदनगर आणि औरंगाबाद ही दोन शहरे मुंबईशी जोडली जाणार आहेत.
मात्र, या मार्गावरील इतर खासगी वाहतूकदारांच्या बसगाडय़ा रात्री दादरहून अथवा मुंबईहून निघून पहाटे औरंगाबाद येथे पोहोचतात.
अनेक प्रवाशांना हा रात्रीचा प्रवास अधिक सोयीचा वाटतो आणि त्यांची पसंती या खासगी वाहतूकदारांना मिळते. एस.टी.ने ही गोष्ट ध्यानात न घेता आपली सेवा पहाटे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहाटे दादरला पोहोचण्यासाठी मुंबईकरांकडे खूप कमी पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे प्रवासी या सेवेकडे पाठ फिरवण्याची शक्यता जास्त असल्याचे निरीक्षण एस.टी.तीलच एका अधिकाऱ्याने नोंदवले आहे. मात्र, खासगी वाहतूकदारांची स्पर्धा टाळण्यासाठी आणि प्रवाशांना एक उत्तम पर्याय देण्यासाठी एस.टी.ने आपली सेवा पहाटे चालवण्याचा निर्णय घेतल्याचे एस.टी.च्या वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadar aurangabad shivneri bus service may get low response
First published on: 03-11-2015 at 04:37 IST