चार दिवसांत तीन पूल जमीनदोस्त, एक पूल अंशत: पाडला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लगतचा हिमालय पूल कोसळून सहा जणांचे प्राण गेल्यानंतर धास्तावलेल्या मुंबई पालिका प्रशासनाने अतिधोकादायक पूल पाडण्याचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या गुरुवारी मरिन लाइन्स रेल्वे स्थानकाबाहेरील दोन पादचारी पुलांवर हातोडा चालविल्यानंतर शनिवारी कुर्ला येथील बर्वेनगरचा पूल जमीनदोस्त करण्यात आला.

कुर्ला येथील खैरानी रोडवरील पूल अंशत: तोडण्यात आला. त्याचबरोबर कांदिवलीमधील तीन पूल वापरासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले. काही दिवसांत हे पूलही पाडण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. हिमालय पूल दुर्घटनेमुळे पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे पुलांच्या संरचनात्मक तपासणीसाठी नियुक्त केलेल्या तांत्रिक सल्लागारांनी अतिधोकादायक ठरवलेले पूल पाडून टाकण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

रंगपंचमीनिमित्त असलेल्या सुट्टीचे निमित्त साधून गुरुवारी महर्षी कर्वे मार्गावरील मरिन लाइन्स रेल्वे स्थानकाबाहेरील पूर्वेकडील दोन धोकादायक पादचारी पूल पाडण्यात आले. कुर्ला (पश्चिम) परिसरातील साकीनाका येथील खैरानी रोडवरील नाल्यावरून जाणारा धोकादायक पूलही शनिवारी अंशत: तोडण्यात आला. पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्याचा काही भाग पादचाऱ्यांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेण्यात आल्याची माहिती ‘एल’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांनी दिली. पादचाऱ्यांसाठी पर्यायी तात्पुरता पूल उभारण्याचा विचार सुरू असून त्याची व्यवस्था झाल्यानंतर या पुलाचा उर्वरित भाग पाडून टाकण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

घाटकोपर (पश्चिम) येथील बर्वेनगरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयाजवळील पादचारी पूल धोकादायक असल्याचे तांत्रिक सल्लागारांनी जाहीर केले होते. त्यामुळे या पादचारी पुलाचा धोकादायक भाग पाडून उर्वरित भाग मार्गरोधक (बॅरिकेड्स) बसवून बंद करण्यात आला होता. या पुलाचा उर्वरित भागही शनिवारी पाडण्यात आला, अशी माहिती ‘एन’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली.

कांदिवली परिसरातील विठ्ठल मंदिर, इराणी वाडी, रगडापाडा; एस.व्ही.पी. रोडवरील कृष्णकुंज इमारतीजवळील; तसेच हनुमाननगर येथील आकुर्ली रोड अशा तीन ठिकाणचे उड्डाणपूल अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले होते. विठ्ठल मंदिर, इराणी वाडी आणि आकुर्ली रोडवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते तरीही एस.व्ही.पी. रोडवरील कृष्णकुंज इमारतीजवळील उड्डाणपुलावरून वाहतूक सुरूच होती. पालिकेने शनिवारी हे तिन्ही उड्डाणपूल वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी पूर्णपणे बंद केले. ते तीन-चार दिवसांत पाडण्यात येतील, असे ‘आर-दक्षिण’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले.

सहा पुलांची टांगती तलवार

सल्लागारांनी धोकादायक ठरवलेले १४ पैकी चार पूल यापूर्वीच पाडण्यात आले होते. गेल्या चार दिवसांमध्ये तीन पूल पूर्णत:, तर एक पूल अंशत: पाडण्यात आला. मात्र उर्वरित सहा पूल सुरक्षिततेच्या कारणास्तव वापरासाठी बंद करण्यात आले आहेत. हे सहा पूल पाडण्यासाठीपालिकेला मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे आजही या पुलांची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर आहे.