दिवाळीनंतर गेल्या दहा दिवसांत मुंबईतील प्रतिबंधित इमारती आणि झोपडपट्टय़ांची संख्या कमी झाली आहे. सध्या मुंबईत ४०७ झोपडपट्टय़ा व चाळी, तर ४७९० इमारती प्रतिबंधित आहेत. विशेष म्हणजे वरळी आणि प्रभादेवीत एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही.

दिवाळीनंतर मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार दर दिवशीची रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मोठय़ा संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या बऱ्यापैकी स्थिर आहे. तर दुसरीकडे मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची व इमारतींची संख्या दिवाळीनंतर गेल्या दहा दिवसात चांगलीच कमी झाली आहे.

दिवाळीनंतर १७ नोव्हेंबर रोजी ८९४६ रुग्ण उपचाराधीन होते. तर २७ नोव्हेंबरला उपचाराधीन रुग्णांची संख्या १२,५८८ होती. गेल्या दहा दिवसांत मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी २९७ दिवसांवरून १९५ दिवसांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.२३ टक्क्य़ांवरून ०.३६ टक्क्य़ांपर्यंत वाढला आहे.

रुग्णांची संख्या वाढलेली असली तरी मुंबईतील प्रतिबंधित इमारती व क्षेत्रांची संख्या घटली असल्याचे चित्र आहे. मुंबईत सध्या ४०७ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये २५ लाख लोक राहत आहेत. तर ४७९० प्रतिबंधित इमारतीत १० लाख लोक राहत आहेत. असे किमान ३५ लाख लोक प्रतिबंधित भागात आहेत.

आकडेवारी अशी.. : मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांपैकी सर्वाधिक क्षेत्रे दादर, धारावीचा भाग असलेल्या जी-उत्तर विभागात ४२९ इतकी आहे. तर त्याखालोखाल भांडूपमध्ये ४१, अंधेरी पूर्वमध्ये ३९, घाटकोपरमध्ये ३८, दहिसरमध्ये ३१ इतकी आहेत. तर एकेकाळी अतिसंक्रमित म्हणून ओळख असलेल्या वरळी, प्रभादेवीत मात्र एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही.

१७ नोव्हेंबरची स्थिती

प्रतिबंधित इमारती – ५२२७
प्रतिबंधित झोपडपट्टय़ा आणि चाळी – ४४९

२७ नोव्हेंबरची स्थिती

प्रतिबंधित इमारती – ४,७९०
प्रतिबंधित झोपडपट्टय़ा आणि चाळी – ४०७