दीडशे दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध; मात्र उन्हाळ्यात पातळी खालावण्याची चिन्हे

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात तलावांमधील जलसाठा खालावू लागला असून साधारण १५० दिवस पुरेल इतका जलसाठा तलावांमध्ये उपलब्ध आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाष्पीभवनाचे वाढणारे प्रमाण आणि त्यामुळे तलावातील जलसाठय़ावर होणारा परिणाम मुंबईकरांची चिंता वाढविण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टच्या अखेरीस पावसाने दडी मारली होती. सप्टेंबरमध्ये पाऊस गायबच झाला होता. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभर तहान भागविण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा उच्चस्तर वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणा या तलावांमध्ये उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे पालिकेच्या जल विभागाला मुंबईमध्ये १० टक्के पाणी कपात करणे भाग पडले. त्याचसोबत पाणीपुरवठय़ाच्या वेळेमध्येही कपात करण्यात आली. यामुळे अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये १ फेब्रुवारी रोजी सात लाख ५ हजार ४२३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. महिनाभर मुंबईकरांची तहान भागविल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी जलसाठा पाच लाख ५९ हजार ६९६ दशलक्ष लिटर झाला. फेब्रुवारीमध्ये मुंबईकरांना एक लाख ४५ हजार ७२७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमध्ये सात लाख ६२ हजार १६५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते. आजघडीला तलावामध्ये उपलब्ध असलेले पाच लाख ५९ दशलक्ष ६९६ दशलक्ष लिटर पाणी साधारण १५० दिवस पुरेल, असे जल विभागातील अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी तलावांमधून दर दिवशी ३,६५० दशलक्ष लिटर पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबईत आणले जाते. त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येते. पाणी वाहून आणण्याच्या प्रक्रियेत १३५ दशलक्ष लिटर पाण्याचा अपव्यय होते. उर्वरित ३,५१५ दशलक्ष पाणी जलवाहिन्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून मुंबईकरांच्या घरी पोहोचविण्यात येते. सध्या दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. तसेच लवकरच उन्हाळा सुरू होत आहे. उपलब्ध जलसाठय़ाचा मुंबईकरांना काळजीपूर्वक पुरवठा करावा लागेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.