News Flash

नागरिकांना लस निवडीचे स्वातंत्र्य देण्याची मागणी

आपल्याला हवी ती लस मिळविण्यासाठी आता पळवाट नागरिकांनी शोधली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शैलजा तिवले

शहरात ज्येष्ठांसह ४५ वर्षांवरील रुग्णांसाठी लसीकरण खुले केले असले तरी लस निवडण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळे केंद्रावर कोणती लस दिली जाते याची खातरजमा करून नंतर लस घेण्यासाठी जाण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे काही केंद्रावर गर्दी आणि काही ठिकाणी कमी प्रतिसाद असेही चित्र दिसत आहे. नागरिकांना लस निवडीचे स्वातंत्र्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

सध्या देशभरात कोव्हिशिल्ड आणि कोव्ॉक्सिन या लशी दिल्या जात आहेत. यातील कोव्हिशिल्ड लसीने तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत, तर कोव्हॅक्सिनच्या अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. लसीची परिणामकता आणि प्रभाव याबाबत अद्यापही साशंकता असल्याने कोव्ॉक्सिन घेण्यास नागरिक फारसे उत्सुक नाहीत. त्यात लसीच्या नोंदणीसाठी उपलब्ध केलेल्या संकेतस्थळावर कोव्हिशिल्ड किंवा कोव्ॉक्सिन यापैकी कोणती लस घ्यायची आहे, हे निवडण्याचा पर्याय दिलेला नाही. केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती घ्यावी लागेल असे केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. आपल्याला हवी ती लस मिळविण्यासाठी आता पळवाट नागरिकांनी शोधली आहे.

कोव्ॉक्सिन घेणाऱ्यांची संख्या दोन ते तीन टक्के

राज्यात कोव्हिशिल्डच्या तुलनेत कोव्ॉक्सिन लसीची केंद्रे कमी आहेत. ही लस घेणाऱ्यांची संख्याही दरदिवशी होणाऱ्या लसीकरणाच्या जवळपास दोन ते तीन टक्के आहे. राज्यात गुरुवारी ५१ हजार २४० नागरिकांचे लसीकरण झाले. यात ५० हजार २६३ जणांनी कोव्हिशिल्ड तर केवळ ९७७ जणांनी कोव्ॉक्सिन घेतल्याची नोंद आहे.

दोन्ही लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयात नागरिक पैसे देऊन लस घेत आहेत. त्यामुळे त्यांना लस निवडण्याचा पर्याय द्यायला हवा होता. जेणेकरून ही पळवाट शोधण्याची वेळ नागरिकांवर आली नसती, असे मत पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

खासगी रुग्णालयांमध्येही ज्येष्ठांना प्राधान्य देण्याचे न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : कोविडच्या काळात सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्येही वृद्धांना प्राधान्याने प्रवेश द्यावा, असा आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. यापूर्वी केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये वयोवृद्धांना प्राधान्याने प्रवेश देण्याचे आदेश ४ ऑगस्ट २०२० रोजी न्या. अशोक भूषण आणि न्या. आर. एस. रेड्डी यांच्या पीठाने दिला होता त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी न्यायालयाने केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांना प्राधान्य देण्याबाबतचा आदेश ४ ऑगस्ट २०२० रोजी न्यायालयाने दिला होता, असे या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी ज्येष्ठ वकील अश्विनीकुमार यांनी निदर्शनास आणून दिले. खासगी रुग्णालयातही प्राधान्य द्यावे अशी मागणी केली.

लस घेण्यापूर्वी चौकशी

मागील दोन दिवसांपासून कोणती लस दिली जाते, याची चौकशी करणारे अनेक नागरिक येत आहेत. काही दूरध्वनीवरूनही चौकशी करत आहेत, अशी माहिती पालिकेच्या लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. कोणती लस दिली जाते याची खात्री करण्यासाठी लस घेतलेल्या व्यक्तींनाही विचारणा करणारे काही ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर दिसून आले.

दोन्ही लशी सुरक्षितच..

मुंबईत बहुतांश ठिकाणी कोव्हिशिल्ड लस असली तरी जे.जे. रुग्णालयासारख्या काही केंद्रात कोव्हिशिल्ड आणि कोव्ॉक्सिन दोन्ही लसी दिल्या जातात. तेव्हा हे केंद्र निवडणाऱ्यांना त्यांना हवी ती लस घेता यायला हवी. राज्यात इतरत्रही या दोन्ही लसी दिल्या जात असून त्या सुरक्षित आहेत. परंतु यातील एक निवडण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना द्यायला हवे, असे मुंबई असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी व्यक्त केले.

काही केंद्रानाच प्रतिसाद

लस घेण्यासाठी नोंदणी करण्यापूर्वी किंवा लस घेण्यास जाण्यापूर्वी कोणत्या केंद्रावर कोणती लस दिली जाते, याची चौकशी नागरिक करत आहेत.  नोंदणी करताना हवी ती लस उपलब्ध असलेल्या केंद्राची निवड नागरिक करत आहेत किंवा केंद्रावर नोंदणी न करताच थेट लस घेण्यास रांग लावत आहेत. मात्र, त्यामुळे काही केंद्रावर गर्दी आणि काही केंद्रामध्ये प्रतिसादाचा अभाव दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:26 am

Web Title: demand for freedom of choice of citizens abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 विरार-डहाणू रेल्वे मार्गासाठी २४ हजार खारफुटी तोडण्यास परवानगी द्या
2 शुल्क कपातीला संस्थाचालकांचा विरोध
3 अर्थस्थिती बिकट!
Just Now!
X